बारामती: मध्यप्रदेश मधील १८ कोटी ५० लाख रूपयांच्या फसवणूक प्रकरणी काटेवाडी(ता.बारामती) येथील युवकास तालुक्यातील मोरगांव येथे अटक करण्यात आली.कोट्यावधी रुपयांच्या प्रकरणाची पाळेमुळे बारामती तालुक्यापर्यंत पोहचल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीस बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या मदतीने गुरुवारी(दि. 15) रात्री अटक करण्यात आली आहे. योगेश अजित काटे (रा. काटेवाडी ता बारामती जि. पुणे) हा असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप बिल्डकॉन लिमिटेड भोपाळ या कंपनीचे पंजाब नॅशनल बँकेचे १८ कोटी ५० लाख रूपयांचे चेक क्लोनिंग करण्यात आले.त्यानंतर संबंधित चेक आयडीबीआय बँकेच्या मॅनेजरच्या मदतीने ओडीसा येथील एका इसमाच्या करंट अकाउंटवर टाकुन फसवणूक केल्याबाबत स्पेशल टास्क फोर्स भोपाळ (मध्यप्रदेश) येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्हयातील आरोपी आडीबीआय बॅकेचे मॅनेजर सरोज महापात्रा यास यापूर्वी अटक केली आहे. गुन्हयातील आरोपी योगेश अजित काटे (रा. काटेवाडी ता बारामती जि. पुणे) हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता.
आरोपीचा शोध घेण्यासाठी एसटीएफ भोपाळ येथील तपास पथकाने बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना मदत मागितली. त्यानंतर ढवाण यांनी तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी काटे याला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे बारामती तालुका पोलीस ठाणेकडील पथकाने हायटेक तपास करत आरोपी काटे यास मोरगाव रोड (ता. बारामती) येथून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी भोपाळच्या स्पेशल टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते ,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.