पुणे : कोथरूड परिसरात प्रचाराची सांगता होण्यापूर्वी विविध राजकीय पक्षांनी पदयात्रा काढून, दुचाकी यात्रा काढल्या. सकाळपासून सर्वत्र फिरणाऱ्या रिक्षा, चारचाकी वाहनांवरून होणारा ध्वनिप्रचार सायंकाळी साडेपाचच्या आत बंद होईल, अशी दक्षता घेण्यात आली.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही छोट्या छोट्या वाहन यात्रा काढून दिवसभरात प्रचार केला. निवडणूक यंत्रणेची वाहने फिरून कोठे काही अनुचित प्रकार होत आहे काय, याची चाचपणी करत होते. मिरवणुकांचे व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे चित्रण केले जात होते.दरम्यान, गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेली प्रचाराची गजबज सायंकाळनंतर शांत झाली. प्रभागाच्या विस्तृत आकारमानामुळे प्रचारासाठी पक्षांनी तयार केलेली वाहने प्रत्येक गल्ली-बोळात जाण्यास मर्यादा होत्या. मात्र, सर्वत्र एकदा तरी अशा वाहनांनी धावती भेट दिली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रचार संयमित झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये होती. (प्रतिनिधी)१ रविवारची सुटी असल्याने बहुसंख्य मतदार घरीच होते. सकाळी अनेक ठिकाणी प्रचारफेऱ्या पाहण्यासाठी लोक खिडक्यांमधून, गॅलऱ्यांमधून डोकावत होते. उमेदवारांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होते. रस्त्यावर, चौकांमध्ये थांबलेल्या नागरिकांकडे पाहून उमेदवार ‘व्हिक्टरी’ची खूण करीत होते.२ शिवसेनेच्या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात वाहनांवरून मिरवणुका काढून किंवा पदयात्रा काढून प्रचाराची राळ उडवून दिली. कोथरूड परिसरातील उमेदवारांनी सकाळी साडेनऊनंतर शिवाजीपुतळ्यापासून पदयात्रेला सुरुवात केली. भगवे झेंडे घेतलेल्या शेकडो स्त्री-पुरुषांचा, युवक व बालकांचा समावेश या पदयात्रेत होता. सुमारे दीड हजार महिला सामील होत्या. विविध मार्गांनी फिरून प्रचार केल्यानंतर, दुपारी या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.३ भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दुपारी दुचाकी यात्रा काढली. उघड्या जीपमध्ये उभ्या असलेल्या उमेदवारांनी मतदारांना अभिवादन केले. फेटे परिधान केलेल्या दुचाकीस्वार महिलांचा या यात्रेत लक्षणीय सहभाग होता.
कोथरूडला प्रचार सांगता शांततेत
By admin | Published: February 20, 2017 3:15 AM