राजगुरुनगर : खेड तालुक्यातील शिरगाव (विठ्ठलवाडी) येथे कातकरीवस्तीवर नागरिक व महिलांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाण व अत्याचाराची चौकशी व्हावी, तसेच २८ कातकरी बांधवांना विनाकारण अटक केल्याबद्दल तहसील कचेरीवर कातकरी बांधवांनी मोर्चा काढला होता. तहसील कचेरीसमोर बुधवारी दिवसभर धरणे आंदोलन धरले.चार दिवसांपूर्वी विठ्ठलवाडी येथील ५० घरांच्या कातकरीवस्तीवर तयार होत असलेल्या गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांनी छापा टाकून गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. यावेळी येथील ग्रामस्थांनी जमाव जमवून पोलीस व होमगार्ड यांच्यावर हल्लाकेला होता. याबाबत विठ्ठलवाडी येथे पोलिसांनी मोठा फौजफाटा नेऊन २३ महिला व ५ पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ४ दिवसांची पोलीस कस्टडी दिली होती. तसेच गरोदर, बाळंत झालेल्या महिलांना बेदम मारहाण केली.या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी (दि. ४) आदिवासी बांधवांनी पोलिसांच्याविरोधात मोर्चा काढला होता. महिलांनी पोलिसांच्या निषेधाचे फलक घेऊन हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्यापासून ते तहसील कचेरीपर्यंत असा निषेध मोर्चा पोलिसांविरुद्ध घोषणा देत काढला होता. यामध्ये माहिला व लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. विठ्ठलवाडी येथील कातकरीवस्तीवर दोन-तीन गावठी दारू गाळण्याचे अड्डे आहेत. त्यावर हे कातकरी बांधव उपजीविका करतात. आम्ही सर्व हे अवैध गावठी दारूधंदे बंद करतो. आम्हाला जगण्यासाठी काहीतरी नोकरी द्या, अशी भूमिका या वेळी कातकरी बांधवांनी नायब तहसीलदार राजेश कानसकर, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्यासमोर मांडून तहसील कचेरीसमोर दिवसभर धरणे आंदोलन धरले.या वेळी वैष्णवी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष शांताराम हंडोरे, सामाजिक कार्यकर्त्या ठमा पवार, संदीप साबळे, शरद चव्हाण, मदनलाल मुथ्था, युवराज लांडे, शिवाजी चौरे, जनाबाई चौरे, संतोष पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कातकरी बांधव उपस्थित होते.
कातकरी बांधवांचा ठिय्या!, अमानुष मारहाणीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 6:28 AM