-संतोष गाजरे
कात्रज (पुणे) : दक्षिण पुण्यातील महत्त्वाचा आणि कात्रज तसेच कोंढवा भागातील वर्दळ कमी करण्यासाठी उपयोगी ठरणारा कात्रज-कोंढवा रस्ता २०२१ मध्ये पूर्ण होणार होता. मात्र २०२३ सुरू झाले तरी अद्याप रस्त्याचे ५० टक्के कामही झालेले नाही. काही सोसायट्यांच्या जागांचे हस्तांतरणाअभावी तो पूर्ण होऊ शकला नाही यासाठी अंतिम मुदतदेखील देण्यात आली होती. मात्र त्याचा परिणाम रोजच्या वाहनधारकांना होत आहे.
राजस सोसायटी चौक ते खडी मशीन चौक दरम्यान ३.५ किलोमीटर लांबीचा कात्रज-कोंढवा रस्त्याचा कामाचे भूमिपूजन २ नोव्हेंबर २०१८ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. परंतु अद्याप हा रस्ता पूर्ण झाला नाही. जमीन अधिग्रहणासाठी २६८ कोटींचा निधी देण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वता मान्यता दिल्याचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले.
दरम्यान कात्रज-कोंढवा रस्ता प्रकल्पासाठी १९५ जमीन मालकांकडून संपादित करायची होती. परंतु महापालिकेला सर्व जमीन मालकांकडून जमीन संपादित करण्यात यश आले नाही. काही जागा मालक रोख भरपाईची मागणी करीत जमीन देण्यास अडून बसले त्यामुळे हा रस्ता रखडला.
उपमुख्यमंत्री यांनी कात्रज कोंढवा रोड जागा अधिग्रहणासाठी २६८ कोटी निधी देणार असून ६०% निधी राज्यसरकार तर ४० % निधी मनपा खर्च करणार असून दोन हजार कोटींच्या विविध विकासकामांच्या प्रस्तावासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री यांनी यासाठी मान्यता दिली असून सरकार यावर्षी कामे सुरू होतील एवढे पैसे देईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे एका कार्यक्रमात दिली.
आमदार मागील एक वर्षापासून या भागात फिरकले नसल्याचा आरोप टिळेकर यांनी केला तर स्वतःचे अपयश लपवण्यासाठी माजी आमदार करमणूक म्हणून व्हिडीओ करत असल्याचा आरोप आमदार चेतन तुपे यांनी केला आहे.
आता तरी राजकीय श्रेयवाद थांबणार का..?
कात्रज कोंढवा रोड मागील चार पाच वर्षांपासून या ना त्या कारणावरून रखडला असून इकीकडे लोकप्रतिनिधी मात्र श्रेयवादात अडकले आहेत. कात्रज कोंढवा रस्त्यावर नेहमी अपघात होत असतात यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर शेकडो लोक अपघातात जखमी झाले आहेत. त्यामुळे श्रेयवाद न करता नागरिकांच्या हितासाठी रस्ता लवकर करावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
आम्ही ज्या कात्रज कोंढवा रोडसाठी संघर्ष करत होतो त्या रस्त्याच्या जागा अधिग्रहणासाठी २६८ कोटींचा निधी मिळणार आहे. फक्त राजकारण करून या तीन वर्षांच्या काळात रस्त्याचे काम थांबवलं गेलं. महानगरपालिकेत भाजपची सत्ता नसताना संघर्ष केला आंदोलने केली. भाजपाची सत्ता येताच निधी मंजूर करून रस्त्याचे काम सुरू केले.
- योगेश टिळेकर, माजी आमदार.
रस्ता ८० मीटर करणार की ५५ मीटर करणार हे पहिलं जाहीर करावं, महानगरपालिकेत भाजपाची सत्ता होती, हे त्यावेळी आमदार होते. यांचेच त्या भागात नगरसेवक जास्त होते मग रस्ता का झाला नाही. ९० कोटीवरून टेंडर १६० कोटी वरती फुगवले...कशासाठी हे उत्तर त्यांनी द्यावे.
- चेतन तुपे, आमदार, हडपसर विधानसभा मतदार संघ.