पुणे : नियोजन न करता घाईगडबडीत सुरू करण्यात आलेल्या ‘कात्रज-कोंढवा’ रस्ता रुंदीकरणाचे काम ठप्प झाले आहे. या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागाच अद्याप ताब्यात आलेल्या नाहीत. प्रशासनाने नेमलेल्या सल्लागारानेही प्रकल्पाचे काम सोडून दिले आहे. त्यामुळे या कामातील अडथळ्यांची मालिका संपण्यास तयार नाही. सहा महिन्यांनंतर या प्रकल्पाची मुदत संपणार असून आतापर्यंत अवघे २० टक्केच काम झाले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवडणुकांपूर्वी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या कामासाठी आवश्यक असलेल्या जागांपैकी ७४ टक्के जागेचे संपादन विशेष मोहिमेद्वारे केले. परंतु, उर्वरीत जागेच्या मोबदल्यात रोख मोबदला देण्याची मागणी जागा मालकांनी केली आहे. या जागा ताब्यात न आल्याने थोड्या थोड्या अंतरावर कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असून गंभीर आणि किरकोळ स्वरूपाचे अपघातही घडत आहेत.
===
पीपीपीसह अन्य मॉडेलद्वारे रस्ता विकसित करण्यात येणार होता. ठेकेदार नेमणुकीवरून झालेले आरोप आणि मोठा खर्च यामुळे प्रतिसाद कमी मिळाला. त्यामुळे पालिकेनेच हा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २५० कोटींची प्रकल्प रक्कम १५० कोटी रुपयांपर्यंत कमी झाली.
===
प्रकल्पासाठी ८० टक्क्यांपेक्षा अधिक भूसंपादन होणे आवश्यक असते. त्याशिवाय वर्कआॅर्डर देता येत नाही. मात्र, या नियमाला हरताळ फासत ठेकेदार कंपनीला वर्क आॅर्डर देण्यात आली. जुन्या रस्त्याच्या डागडुजीचे काम अडीच वर्षांपासून बंद असल्याने परिणामी रस्त्यांवर खड्डे, साइडपट्ट्यांवर राडारोडा मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे. असे असतानाही ठेकेदाराला आतापर्यंत ३० ते ३५ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत.