- अभिजित डुंगरवालकात्रज - महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या सुमारे १३० एकरांवरील कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाकडे पुणे महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे प्राणिसंग्रहालयामध्ये सुरू असलेल्या प्राणी दत्तक योजनेतून मिळणारा महसूल मागील ९ वर्षांतील नीचांकावर गेला आहे. शहराच्या या वैभवाकडे पुण्यनगरीतील एकाही राजकीय नेत्याचे लक्ष नाही, हीच खरी नागरिकांची शोकांतिका आहे.जगातील सर्वांत लांब जाळीदार अजगर, महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू, सिंह, हत्ती, नागराज किंग कोब्रा, पांढरा वाघ, पट्टेरी वाघ यांसह ६३ प्रजातींतील सुमारे ४१० प्राणी या संग्रहालयात आहेत. प्राणिसंग्रहालयातील सुरक्षा अनेक वर्षांपासून चिंतेचा विषय बनला आहे. घुबडचोरी, चंदनाच्या झाडाची चोरी अशा अनेक घटना या ठिकाणी नेहमी घडत असतात. पालिकेचे सुमारे ५० कर्मचारी व काही कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या जिवावर येथील कारभार चालतो. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २०१२मध्ये या संग्रहालयाला ‘मॉडेल झू’ जाहीर केले; मात्र सहा वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे दत्तक योजनेमध्ये या वर्षी मागील ९ वर्षांचा नीचांक या प्राणिसंग्रहालयाने गाठला आहे.सुमारे १८ लाख पर्यटक या प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. त्यामध्ये विदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे. ४.५ कोटी रुपये महसूल तिकिटामार्फत दर वर्षी पालिकेला मिळतो. मात्र, पर्यटक वाढावेत, त्यांना काही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, याकडे पूर्णपणे दुर्लक्षकेले जात आहे. येथे येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी साधा नाष्टा करण्यासाठी कँटीन सुविधादेखील येथील प्रशासन उपलब्ध करून देऊ शकलेले नाही.प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळच असलेली अतिक्रमणे येथील प्रेक्षकसंख्या कमी करण्यास जबाबदार आहेत. प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षा भिंती अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. सीसी टीव्हीदेखील चांगल्या प्रतीचे नाईट व्हिजन, व्हाईस रेकॉर्ड करणारे बसवले गेले नाहीत. त्यांचा कमीत कमी ३ महिन्यांचा बॅकअप असणे आवश्यक आहे.संपूर्ण प्राणिसंग्रहालय सीसी टीव्हीच्या नियंत्रणात येणे आवश्यक आहे. बंदूकधारी सुरक्षारक्षक या ठिकाणी असणे गरजेचे आहे. तरच, येथील चोºया व घडणारे घातपात टाळले जाऊ शकतील. प्राणिसंग्रहालयाच्या प्रथमदर्शनी भागात दत्तक योजनेचे बोर्ड लावणे अपेक्षित आहे.
कात्रज प्राणिसंग्रहालयाकडे दुर्लक्ष, दत्तक योजनेत महसुलाचा नीचांक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 2:17 AM