दौंड : केडगाव (ता. दौंड) येथे कांदा मार्केट सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती समितीचे सभापती सागर फडके यांनी दिली.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुणे शहरात कांदा विक्रीसाठी नेताना वाहतूककोंडी, वाहतुकीच्या व अन्य समस्या भेडसावत आहेत. तेव्हा दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने केडगाव येथे कांदा मार्केट सुरू करण्याबाबत चर्चा दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केडगाव कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाल्याची माहिती सागर फडके यांनी दिली.
राष्ट्रीय कृषी बाजार योजना (ई- नाम) अंतर्गत शेतमाल विक्रीचे व्यवहार आॅनलाइन लिलावांद्वारे सुरू आहेत. दौंड बाजार समिती राज्यात अव्वल स्थानावर असून, दौंड येथे बाजार समितीच्या जागेत मुख्य प्रवेशद्वाराजवळ पेट्रोल पंप प्रस्तावित आहे. शेतकºयांसाठी दौंड व केडगाव येथे शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, असेही फडके यांनी सांगितले. यावेळी पंचायत समितीचे सभापती झुंबर गायकवाड, बाजार समितीच्या उपसभापती सीमा जाधव, संचालक रामचंद्र चौधरी, सुभाष नागवे, माणिक राऊत, उत्तम ताकवले, भास्कर देवकर, महादेव यादव, दत्तात्रेय पाचपुते, दिलीप हंडाळ, सागर शितोळे, शाम ताकवणे, लक्ष्मण दिवेकर आदी संचालक उपस्थित होते. समितीचे सचिव तात्यासाहेब टुले यांनी अहवालवाचन केले.