पुणे : गेल्या काही दिवसांपासून विविध सिम कार्ड कंपन्यांच्या नेटवर्क मध्ये अडचणी येत असताना आता तुम्हाला तुमच्या माेबाईलमध्ये 35 रुपये बॅलन्स ठेवणे अनिवार्य झाले आहे. अन्यथा तुमची आऊटगाेईंग सेवा बंद हाेऊ शकते तसेच सिमकार्डही काही दिवसात बंद हाेऊ शकते अशी माहिती सिमकार्ड कंपनीतील सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता फाेनमध्ये किमान 35 रुपये बॅलन्स असणे आवश्यक असणार आहे.
सिमकार्ड कंपन्यांच्या शर्यतीत जेव्हा पासून जिओ कंपनीने उडी घेतली आहे. तेव्हापासून अनेक माेठ माेठ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून काही प्रतिष्ठीत कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये अनेक अडचणी येत आहेत. काॅल ड्राॅप हाेणे, फाेरजी रिचार्ज केलेले असताना फाेरजीचा स्पीड न मिळणे, अनेक ठिकाणी नेटवर्क नसणे अशा असंख्य समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांना आपल्या फाेनमध्ये दाेन सिमकार्डचा वापर करावा लागत आहे. जिओ कंपनीचे इंटरनेट वापरण्यावर अनेक नागरिकांचा कल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आयडीया, व्हाेडाफाेन, ऐअरटेल या कंपनीच्या ग्राहकांना किमान 35 रुपयांचे रिचार्ज करा अन्यथा तुमची सेवा खंडीत हाेईल असा मेसेज कंपनीकडून केला जात आहे. अनेकांचे सिमकार्ड बंद देखील करण्यात आले आहे. यामुळे आधीच त्रस्त असलेले ग्राहक सिम बंद हाेत असल्याने अधिक त्रस्त हाेत आहेत.
आयडीया आणि व्हाेडाफाेन कंपनीतील सूत्रांच्यानुसार या कंपन्यांनी नवीन नियम तयार केला असून त्याअंतर्गत आता ग्राहकांना सिम कार्ड सुरु ठेवण्यासाठी किमान 35 रुपये बॅलन्स फाेनमध्ये ठेवावा लागणार आहे. किंवा 35 रुपयांहून अधिक रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. अन्यथा सिमकार्ड बंद देखील हाेऊ शकते. वैधही पाठक म्हणाली, अनेक दिवसांपासून मी माझे आयडीयाचे रिचार्ज केले नव्हते. त्याचबराेबर इंटरनेटसाठी सुद्धा वापर करण्यात येत नव्हता. गेल्या काही दिवासांपासून माझे इन्कमिंग आणि आऊटगाेईंग अशा दाेन्ही सुविधा कंपनीकडून बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांना मला संपर्क करता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून याेग्य नेटवर्क आणि फाेरजी स्पीड मिळत नसल्याचे चित्र आहे.
विशाल ताजणे म्हणाले, मला काही दिवसांपूर्वी मला ऐअरटेलकडून किमान 35 रुपयांहून अधिक रुपयांचे रिचार्ज करा अन्यथा तुमची आऊट गाेईंग सुविधा थांबविण्यात येईल असा मेसेज आला आहे.