पुणे : महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कलगीतुऱ्याच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी तातडीची बैठक घेऊन झाडाझडती घेतली. आपापसात वाद घालण्यापेक्षा लोकांच्या विकासकामांकडे लक्ष द्या अशा शब्दांमध्ये त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना सुनावले.स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये समितीची बैठक स्थगित करण्यावरून समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम व सभागृह नेते बंडू केमसे यांच्यामध्ये वादावादी झाली होती. शिक्षण मंडळाच्या शिक्षकांचा विषय मंजूर करूनच समितीची बैठक स्थगित करावी अशी भुमिका सभागृहनेत्यांनी घेतली. तर आयुक्तांनी अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय स्थायी समितीला विश्वासात न घेता केल्याने समितीची बैठक तहकूब करण्याचा निर्णय कदम यांनी घेतला होता. यावरून त्यांचा वाद अजित पवार यांच्यापर्यंत गेला होता. त्याचबरोबर अनावश्यक खर्चाला कात्री लावण्यास स्थायी समितीने विरोध केला होता तर महापौर यांनी अनावश्यक खर्चाला कात्री लावणे योग्यच असल्याची भुमिका नुकतीच मांडली होती. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत नसल्याचे दिसून येत होते.यापार्श्वभुमीवर अजित पवार यांनी शुक्रवारी शहराध्यक्ष वंदना चव्हाण, महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते बंडू केमसे, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांना भेटण्यासाठी बोलावून घेतले. पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आपापसात वाद करणे योग्य नाही. लोकांची कामे करण्याकडे त्यांनी जास्त लक्ष द्या, असे सांगून त्यांनी वादावर पडदा टाकण्यात सांगितले. व विकासकामांबाबत चर्चा केली.
आपापसात वाद घालण्यापेक्षा विकासकामांकडे लक्ष द्या
By admin | Published: October 10, 2015 5:14 AM