पुणे : साहित्यिक, कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने लादणाऱ्यांविरुद्ध आवाज बुलंद केला पाहिजे, मिळेल त्या मार्गाने व्यक्त होत राहणे आपले कर्तव्य आहे, असा निर्धार विवेकी, पुरोगामी विचारवंतांनी गुरुवारी केला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर तसेच गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सुरू झालेल्या दक्षिणायन उपक्रमांतर्गत ‘अभिव्यक्ती’ या विषयावर गोव्यात शुक्रवारी राष्ट्रीय मेळावा होत आहे. त्यात सहभागी होणाऱ्या मंडळींची ‘दक्षिणायन संवाद यात्रा’ गुरुवारी पुण्यातून निघाली. कोल्हापूर, धारवाड या मागार्ने संवाद साधत ती पुढे जाणार आहे. एस. एम. जोशी सभागृहाबाहेरील कट्ट्यावर गुरुवारी झालेल्या विचारमंथनात विवेकी कार्यकर्ते सहभागी झाले होते. ज्येष्ठ कवी प्रा. वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, सुभाष वारे, मोहन देशपांडे, आनंद करंदीकर, गणेश विसपुते, सुरेश सावंत व उल्का महाजन यांनी संवाद साधला.डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने ‘दक्षिणायन’ची सुरुवात झाली. गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय मेळाव्याला लेखक, कवी, विचारवंत, कलाकार, नाटककार, शास्त्रज्ञ, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संदेश भंडारे यांनी दिली.
साहित्यिक, कलावंतांच्या अभिव्यक्तीसाठी लढत राहू
By admin | Published: November 18, 2016 6:18 AM