पुणे : स्वरराज छोटा गंधर्व यांच्या गायकीवर नितांत प्रेम करणाऱ्या दशरथ वाणी या एका रसिकाने स्वरराज छोटा गंधर्व यांच्यासह अलौकिक प्रतिभासंपन्न अशा गायकांच्या जवळपास ४८ रेकॉर्ड्सचा ठेवा स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान या संस्थेकडे सुपूर्द केला आहे.
संगीत नाटकांची आवड असलेल्या वाणी यांनी मुंबई-पुण्यात नोकरी करता करता दुर्मिळ वस्तू जमविण्याचा छंद जोपासला. खासकरून छोटा गंधर्व यांची संगीत नाटके पाहणे त्यांनी चुकविले नाही. नाट्यसंगीताची आवड बघून एका मित्राकडून त्यांना रेडिओग्राम आणि काही रेकॉर्ड्स दिल्या. अनेक वर्षे जतन केलेला हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी वाणी यांनी प्रतिष्ठानला हा ठेवा दिला. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या माध्यमातून प्रतिष्ठानकडे या रेकॉर्ड्स देण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून वाणी हे त्यांच्याकडील रेकॉर्ड्स कुणाकडे द्याव्यात या विवंचनेत होते. काही संस्थांशी त्यांनी थेट संपर्कही साधला. पण, निमित्त काही जुळले नाही. पण, काही दिवसांनी निमित्त जुळून आले. त्यातूनच वाणी यांनी हा अमूल्य ठेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चारुशीला केळकर, उपाध्यक्षा सुचेता अवचट यांच्या हाती छोटेखानी कार्यक्रमात सोपविला. ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर यावेळी उपस्थित होत्या.
दशरथ वाणी म्हणाले की, या १९६०-७० सालातील या रेकॉर्ड्स असून स्वरराज छोटा गंधर्व यांच्यासह हिराबाई बडोदेकर, पंडित राम मराठे, पंडित जितेंद्र अभिषेकी आदींच्या रेकॉर्ड्स यात आहेत. गाण्याची आवड असेल, गायकांविषयी आदर असेल अशांकडे हा ठेवा सोपविण्याची इच्छा होती. प्रतिष्ठानचे कार्य पाहून योग्य हातात हा ठेवा दिल्याचे समाधान आहे.
---
फोटो आेळी - दुर्मिळ रेकॉर्डचा अमूल्य ठेवा स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान, पुणे या संस्थेकडे सोपविण्यात आला. या प्रसंगी चारुशीला केळकर, मेधा कुलकर्णी, मधुवंती दांडेकर, दशरथ वाणी, सुचेता अवचट.
फोटो - छोटा गंधर्व