पुणे : पुणे शहरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचू लागले आहे. तसेच खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढत चालल्याने हवामान विभागाने शहराला रेड अलर्ट दिला आहे. तसेच पुढील काही दिवसात अतिवृष्टी होण्याच्या इशाराही देण्यात आला आहे. त्यानंतर शहरातील शाळांना उद्या एका दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर पर्यटन स्थळांवर काही नियम लागू करण्यात आले आहेत. त्यातच पुणे शहरातील पर्यटनाचे मुख्य स्थळ सिंहगड किल्ला तीन दिवस बंद ठेवावा अशा मागणीचे पत्र वनविभागाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.
पावसाळा सुरु झाल्यावर असंख्य पर्यटक गड, किल्ले या पर्यटन स्थळांना भेट देतात. तसेच पुण्यातही पर्यटनाचे मुख्य आकर्षण सिहंगड किल्ला असल्याने त्याठिकाणी प्रचंड गर्दी होते. तरुणाई बरोबरच शालेय सहली, ज्येष्ठ नागरिक सिंहगडावर जात असतात. परंतु पुण्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिंहगडावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असल्याने वनविभागाने सिंहगड बंद ठेवण्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला पाठवले आहे.
जिल्हाधिकारी वनविभागाच्या मागणीवर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार
पुण्यात सुरु असलेल्या पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या ९ किमीच्या मार्गाला दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना १६ जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे. असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आता वनविभागाच्या या मागणीवर काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.