पुणे : भारतीय फिल्म सोसायटी चळवळीच्या प्रणेत्या आणि मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक लघुपटांची निर्मिती केलेल्या विजया मुळे यांच्या वैयक्तिक संग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ आणि चित्रपट या ठेव्याची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) खजिन्यात भर पडली आहे. विजया मुळे यांच्या कन्या अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी हा ठेवा ‘एनएफएआय’कडे सुपूर्द केला आहे.
विजया मुळे यांच्या वैयक्तिक संग्रहामध्ये दोनशेहून अधिक चित्रपटविषयक ग्रंथ, व्हीएचएस टेप्स, १६ एमएम फिल्म्स आदींचा समावेश आहे. चित्रपटविषयक असंख्य मासिके, जर्नल्स, चित्रपटविषयक डिक्शनरी, विविध महोत्सवांतील चित्रपटविषयक माहितीपटांचाही त्यामध्ये समावेश आहे. विजया मुळे यांची निर्मिती असलेला, किशन ऍन्ड द मॅजिक चेरिएटस् हा १६ एमएम शैक्षणिक चित्रपटही त्यात समाविष्ट आहे.
एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, “विजया मुळे यांचा संग्रह मिळणे म्हणजे एक प्रकारे एनएफएआयचाच सन्मान आहे. याबद्दल मी अभिनेत्री सुहासिनी मुळे यांचे आभार मानतो. चित्रपट संशोधकांना या संग्रहाचा निश्चितच उपयोग होईल. मुळेेेे यांच्याप्रमाणे अन्य कोणाकडेही अशा प्रकारचे दुर्मिळ साहित्य असल्यास, एनएफएआयकडे जतन करण्यासाठी द्यावे.”
चौकट
परदेशी निर्मात्यांच्या चित्रपटांचाही समावेश
विजया मुळे यांच्या संग्रहात परदेशी निर्मात्यांच्या चित्रपटांचाही समावेश आहे. फ्रिज लँग निर्मित द इंडियन टॉम्ब, लुईसेेे माल्ले निर्मित कलकत्ता आणि कोलिन लॉ निर्मित मुव्हिंग पिक्चर्स या माहितीपटांचाही समावेश आहे. सुहासिनी मुळे, तपन बोस, सलीम शेख यांनी भोपाळ विषारी गॅस दुर्घटनेवर निर्मित केलेला ‘भोपाळ : बियॉन्ड जिनोसाईड’ हा माहितीपट देखील ‘एनएफएआय’ला मिळाला आहे.