पुणे : आपल्याला मिळालेले आयुष्य इतके स्वस्त नाही... त्याचा कोणत्याही कारणासाठी घात करू नका... मोठे होत असताना आपला रिमोट आपल्या हाती असू द्या, असा सल्ला समुपदेशक शीतल बापट यांनी दिला. निमित्त होते बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे नारायण पेठेतील श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ‘उमलणाऱ्या कळ्या, लेकींना वाचविण्याकरिता जागर’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे. या वेळी बापट यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. या वेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णलता काळे, आरती पटवर्धन, भाग्यश्री बडवे, मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा, गंधाली शहा आदी उपस्थित होते. लोकमतमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या उमलण्याआधीच खुडल्या कोवळ्या कळ्या या बातमीमधून प्रेरणा घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे पीयूष शहा यांनी सांगितले. पुण्यामध्ये प्रेमसंबंध किंवा नैराश्यामुळे किशोरवयीन मुली आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. त्यांना या मागार्पासून परावृत्त करीत मदतीचा हात देण्याकरिता समुपदेशनाचा जागर करण्यात येत आहे. सोमवार पेठेतील आबासाहेब अत्रे प्रशाला आणि प्रेमलीला कन्याशाळा येथे अशाच उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये समुपदेशिका उमा माने आणि अनुराधा सहस्रबुद्धे मार्गदर्शन करणार आहेत. प्रेम, आकर्षण आणि शिक्षणातील चढ-उतारामुळे आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या या लेकींना वाचविण्यासाठी नवरात्रामध्ये समुपदेशनाचा जागर करण्यात येणार असल्याचेही शहा म्हणाले.शीतल बापट म्हणाल्या, प्रेम आणि आकर्षण यामधील फरक समजून घ्यायला हवा. जीवनात कोणत्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. जर सोप्या पद्धतीने म्हणजेच शॉर्टकटने एखादे काम झाले, तर ती धोक्याची घंटा आहे. योग्य वेळी आणि वयात जोडीदार निवडायला हवा. आधी शाळा आणि महाविद्यालयात करिअरमधून स्वत:ला ओळखा. जीवनात मित्र-मैत्रिणी आवश्यक आहेत. परंतु योग्य संगत आणि चांगली मैत्री करण्याकरिता तशी दृष्टी विकसित करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय कला अकादमीच्या कार्यकर्त्यांनी रांगोळी साकारली. पीयूष शहा यांनी सूत्रसंचालन केले.
आपला रिमोट ठेवा आपल्याच हाती
By admin | Published: October 05, 2016 1:47 AM