पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील २१ दिवस देशभरात लॉक डाऊनची घोषणा केल्याने सर्वांना आता घरात थांबावे लागणार आहे. त्यामुळे सकाळी अथवा सायंकाळी फिरायला जाणार्यांचा व्यायाम थांबला आहे. त्याचा सर्वाधिक दुष्परिमाण मधुमेही लोकांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या दिनचर्येत बदल झाल्याने त्याचा प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच व्यायाम बंद झाला व घरात बसल्याने विरंगुळा म्हणून दर काही वेळेने तोंडात टाकणे वाढण्याची शक्यता आहे. त्यातून रक्तातील साखर वाढण्याची शक्यता आहे. लॉक डाऊनच्या काळात घरात बसल्याने रक्तातील साखर वाढू न देण्यासाठी मधुमेही लोकांनी जिभेवर ताबा ठेवावा. तसेच इतरवेळी ज्याप्रमाणे औषध घेत होता. त्याच वेळी औषधे वेळेवर घ्यावीत, असा सल्ला डॉ. जयंत जोशी यांनी दिला आहे.जोशी म्हणाले, मधुमेही लोकांचा आयुष्य हे तीन खांबावर आधारलेले असते. व्यायाम, डायट आणि औषधे हे तीन खांब त्यांच्यासाठी महत्वाचे असतात. आता लॉक डाऊनमुळे त्यातील एक खांब कोसळला आहे, असे म्हणता येईल. आता हा रथ दोन खांबांवर काही दिवस चालवायचा आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या दिनक्रमात काहीही बदल करु नये. घरात बसल्याने टिव्ही पाहत अथवा वाचन करताना काही तरी खाणे होत राहते. त्यात प्रामुख्याने मीठाचे प्रमाण जास्त असलेल्या गोष्टी असतात. त्यावर नियंत्रण राखणे जरुरीचे होणार आहे. व्यायाम बंद झाल्याने रक्तातील साखर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिभेवर ताबा मिळावा लागणार आहे. तसेच आतापर्यंत जी औषधे घेत होता. ती औषधे त्याचवेळी वेळी घ्यावीत. कोणत्याही परिस्थितीत गर्दीत जाऊ नये. प्रकृतीच्या किरकोळ तक्रार असेल तर लगेच डॉक्टरांकडे न जाता २४ तास वाट पहा. जर तरी ती तक्रार कमी नाही झाली तरच डॉक्टरांकडे जा. दवाखान्यातही सोशल डिस्टंसिंग पाळा. इतरांच्या जवळ जाऊ नका. डॉक्टरांकडे आलेल्या इतरांची आपल्याला माहिती नसते. मधुमेही लोकांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्या. भाजीपाला, किराणा, दुध आणण्यासाठी घराबाहेर पडला तरी कोणाच्या जवळ जाणार नाही, याची दक्षता घ्या. घरातल्या घरात शक्य असेल तर जास्तीतजास्त चला. व्यायाम करायला म्हणून बाहेर पडून गप्पाचे अड्डे जमवू नका. घोळका करुन सोसायटीत फिरु नका. राष्ट्रीय संकटात आपण थोडी काळजी घेऊन स्वत:ची दक्षता घेतली तर या संकटातून आपण निभावून नेऊ शकतो, याची खात्री बाळगा, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.
मधुमेही लोकांनो; लॉक डाऊनच्या काळात ठेवा जिभेवर ताबा, वेळेवर घ्या औषधे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 2:32 PM
मधुमेही लोकांनी घ्या ही काळजी
ठळक मुद्देभाजीपाला, किराणा, दुध आणण्यासाठी घराबाहेर पडला तरी दूर राहण्याची दक्षता घ्या