शेलपिंपळगाव : बहुळ (ता. खेड) येथे गावातील राजकारण व मतभेद बाजूला ठेवून तब्बल ३५ वर्षांनंतर गावातील ग्रामदैवत श्रीभैरवनाथ महाराजांची यात्रा एकत्रित साजरी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेली ही संकल्पना इतरांपुढे आदर्श निर्माण करणारी आहे.श्री भैरवनाथ महाराजांना हारतुरे, महानैवेद्य, महापूजा करून सवाद्य वाजतगाजत छबिना मिरवणूक; तसेच धार्मिक भजनाने उत्सवात अधिक रंग भरला. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ग्रामदेवाची विधिवत पूजा करून सकाळी नऊ ते दोन यावेळात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सायंकाळी चारला जंगी निकाली कुस्त्यांच्या आखाड्यास प्रारंभ झाला. कुस्त्यांच्या आखाड्याचे उद्घाटन व बक्षीस वितरण पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी, आमदार सुरेश गोरे, माजी आमदार दिलीप मोहिते - पाटील, ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, छत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, सरपंच गणेश वाडेकर, उपसरपंच समाधान पानसरे, विविध कार्यकारी विकास सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब खलाटे, पोलीस पाटील केशव साबळे, तंटामक्ती समितीचे अध्यक्ष गुलाब वाडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धैर्यशील पानसरे, राजाभाऊ तांबे, बाळासाहेब वाडेकर, पठाणराव वाडेकर, संदीप साबळे, राजाभाऊ साबळे, नाथाभाऊ वाडेकर, दादाराव वाडेकर, धनंजय पठारे आदींसह अन्य मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्ह्यातील नामांकित मल्लांनी कुस्त्यांच्या आखाड्यात सहभाग घेऊन आपल्या खेळाची चमक दाखविली. या वेळी रोख पाचशे रुपयांपासून ५१ हजार रुपयांपर्यंत निकाली कुस्त्या घेण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील महाराष्ट्र चॅम्पियन अरुण खेंगले विरुद्ध आर्मीच्या तान्हाजी वरखडे यांच्या अखेरच्या लढतीत अरुण खेंगलेने बाजी मारली. विजेत्या मल्लांना गावच्या वतीने रोख बक्षिसे, तसेच बबन म्हस्के यांच्या माध्यमातून गोल्ड मेडल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आखाड्यात पै. अनिल साबळे, सखाराम वाडेकर यांनी पंच म्हणून, तर पठाणराव वाडेकर, राजूभाऊ तांबे यांनी समालोचन केले.
मतभेद दूर ठेवत बहुळ गावची यात्रा भरली ३५ वर्षांनंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 1:41 AM