पुणे - एखाद्या ठिकाणी दुचाकी पार्क करून कुठं जायचं म्हटलं की हमखास नको असलेले सामान डिक्कीमध्ये ठेवले जाते; मात्र यापुढे सामान डिक्कीमध्ये ठेवण्याआधी चारवेळा विचार करा? डिक्कीमध्ये सामान ठेवले तर ते चोरीला जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्येडिक्कीमधील सामान चोरीला जाण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे चोरांपासून सावधान! डिक्कीमध्ये सामान ठेवून चोरांच्या हातात आयते कोलीत देऊ नका.कुठेही बाहेर फिरायला किंवा आॅफिस काम अथवा लग्नाला जाताना नको असलेल्या गोष्टी बाळगणे शक्य नसल्याने हमखास दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवण्याची एक सवय झालेली असते; मात्र आता हीच सवय पुणेकरांना महागात पडण्याची शक्यता आहे.कारण, आता डिक्कीमधील सामान चोरण्याचा नवा फंडा चोरट्यांकडून आजमावला जात आहे. तुम्ही कुठं गाडी पार्क करीत आहात? तुम्ही डिक्कीमध्ये कोणते सामान ठेवत आहात, यावर चोरट्यांची बारकाईने नजर असते. तुम्ही गाडी सोडून गेलात की, हे चोर तुमच्या गाडीपाशी जातात, यात काही विशिष्ट कंपनीच्या दुचाकीच्या डिक्की उघडणे सहज शक्य असल्याने ते कुणाच्याही नकळतपणे त्यातील सामान चोरून नेतात.या डिक्की उघडण्यासाठी चाव्याही तयार करण्यात आल्या असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशाप्रकारे डिक्कीमधून सामान चोरून गेल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत.मात्र, सामान काहीसे किरकोळ असल्याने त्याची तक्रार नोंदवायला फारसे कुणी जात नसल्याचेही सांगण्यात आले आहे.प्रसंग 1 : सिंहगड रस्ता येथील हिंगणे खुर्द परिसरात एका महिलेने दुचाकीच्या डिक्कीमध्ये सामान ठेवले होते. गाडी घराबाहेरच पार्क केली होती. सामानाची पिशवी रात्रभर डिक्कीतच राहिली. त्या बाहेर काढायला विसरल्या. दुसऱ्या दिवशी सामान काढायला गेल्या, तर त्यांना पिशवीच गायब झाल्याचे दिसले. खूप शोधाशोध केली, तेव्हा थोड्यावेळाने रिकामी पिशवी काही अंतरावर पडल्याचे दिसले; मात्र पिशवीमधील सामान चोरीला गेले होते. हा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला.प्रसंग 2 : प्रभात रस्ता परिसरात महिलेने गाडी पार्क केली होती. लग्नाला जाऊन आल्यानंतर 500 रुपयांचे परत आहेराचे पाकीट त्यांनी घाईघाईमध्ये डिक्कीमध्ये ठेवले होते. त्या ते घ्यायच्या विसरल्या. दोन तासाने येऊन पाहतात तर ते पाकीट आणि गॉगल चोरीला गेल्याचे लक्षात आले.महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावणे, हातातून मोबाईल हिसकावून पळून जाणे, दुचाकीमधले पेट्रोल चोरणे या गोष्टी शहरात सातत्याने घडत असताना आता या नव्या चोरीच्या प्रकाराने नागरिकांची झोप उडवली आहे.
डिक्कीत सामान ठेवताय, सावधान?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 4:00 AM