पुणे : राजकीय आणि सामाजिक संस्कृती डावीकडे किंवा उजवीकडे वळते आहे, हे अन्यायकारक आहे. राष्ट्रभक्तीला जात आणि धर्माचे बंधन नसते. पण जाती धर्माच्या चौकटीत राष्ट्रभक्तांना बसवून सतत सामाजिक आणि राजकीय मतभेद निर्माण करण्याचे काम होत असून हा अन्यायकारक प्रवाह झुगारून देण्याची गरज आहे. सामाजिक, राजकीय मतभेदांपेक्षा समाज, देश आणि राष्ट्र महत्वाचे आहे, असे मत 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे आज परचुरे प्रकाशनाचे अप्पा परचुरे यांना जीवनगौरव पुरस्काराने तर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांना पहिल्या साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सबनीस बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ लेखक आणि संपादक भानू काळे, प्रसिद्ध लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष शशिकला उपाध्ये, प्रमुख कार्यवाह नितीन गोगटे आदी मान्यवर उपस्थित होते.
अापल्या मनाेगतात सबनीस म्हणाले, परचुरे प्रकाशनाने सावरकरांची पुस्तके प्रसिद्ध करून या खर्या देशभक्ताला अभिवादन केले आहे. मात्र, कोणत्याही राष्ट्रीय व्यक्तीमत्वाच्या राष्ट्रभक्तीकडे संशयाने पाहणार्यांनी सावरकरांवर अन्याय केला हे दुर्दैवी आहे. वाचक, लेखक, संस्कृती रक्षक यांना जोडून ठेवणारा सांस्कृतिक धागा म्हणजे प्रकाशक. दुर्दैवाने संस्कृतीच्या अजेंड्यावरून प्रकाशकाचे नाव बाजूला केले जात आहे. पण ज्ञानाची पाणपोई म्हणजे प्रकाशक होय. लेखक, वाचक आणि प्रकाशकांचा मान राखण्याचे काम समाज आणि शासन या सगळ्यांनीच केले पाहिजे. संकटातून प्रकाशकांची सुटका होणे गरजेचे आहे. प्रा. द.मा. मिरासदार म्हणाले की, लेखक हा पुरस्कार मिळवण्यासाठी लिहित नाही तर व्यक्त होण्यासाठी लिहितो. त्याला पुरस्काराची शाबासकी मिळाली तर निश्चितच प्रोत्साहन मिळते. यावेळी द. मा. मिरासदार यांनी चित्रपट क्षेत्रातील आपल्या कार्याच्या आठवणींना खुमासदार शैलीत उजाळा दिला.