पुणे: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीबाबत प्रशासन सकारात्मक असून सकल मराठा समाजाने सुध्दा शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. खाजगी किंवा शासकीय मालमत्तेचे नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मंगळवारी केले. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर येत्या ९ आॅगस्ट रोजी शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार असल्याचे जिल्हाधिका-यांनी नमूद केले. मात्र,अद्याप शाळा महाविद्यालेय बंद बाबत अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत राम बोलत होते. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, मराठा क्रांती मोर्चाचे समन्व्यक राजेंद्र कोंढरे, बाळासाहेब अमराळे, राहूल पोकळे, विराज तावरे, रघुनाथ चित्रे, तुषार काकडे, युवराज दिसले, हर्षल लोहकरे आदी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनातर्फे मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते.आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्जयोजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी भूमिका मांडली. येत्या ९ आॅगस्ट रोजीचे आंदोलन शांततापूर्ण असेल तसेच रास्ता रोको करण्याचे नियोजन नसल्याचे सांगितले. मराठा आरक्षण प्रश्नी आत्महत्या करण्याचे प्रकार दुदैर्वी आहेत. मृत्यूमुळे होणारे नुकसान कोणीही भरुन काढू शकत नाही,त्यामुळे विद्यार्थी तसेच तरुणांनी चुकीचे पाऊलू नये,असे आवाहन नवल किशोर राम यांनी केले.त्याचप्रमाणे राज्याची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती होण्यामध्ये मराठा समाजाचे योगदान मोठे आहे. राज्यातील सर्वधर्मसमभाव, शांतता, एकोपा कायम ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे,असेही राम यांनी सांगितले.महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना वाहतुक कोंडी किंवा इतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. जिल्हा परिषदेकडून त्यासंदर्भातील जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव प्राप्त झाला आहे,असेही राम यांनी नमूद केले.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही सर्वांची जबाबदारी असून सर्वांमध्ये संवाद कायम राहीला पाहिजे, तसेच तरुणांनी चुकीच्या पध्दतीने आंदोलन करु नये,असे आवाहन संदीप पाटील यांनी केले.
शाळा, महाविद्यालय ९ आॅगस्टला बंद ठेवण्याचा विचार : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 8:52 PM
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना वाहतुक कोंडी किंवा इतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषदेकडून त्यासंदर्भातील जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव प्राप्तखाजगी किंवा शासकीय मालमत्तेचे नुकसान टाळावे असे आवाहन