लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांपासून राज्यात जेधे घराणे सदैव अग्रेसर राहिले आहे. केशवराव जेधे यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम करून ती परंपरा कायम ठेवली, असे मत काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले.
जेधे यांच्या शतकोत्तर राैप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त जेधे वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने केशवरावांच्या स्वारगेट चौकातील पुतळ्याला बागवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रदेश काॅंग्रेसचे सरचिटणीस रोहित टिळक, पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ अमराळे उपस्थित होते.
बागवे यांनी केशवरावांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. भारतीय घटना समितीचे सदस्य असलेले केशवराव तत्कालीन समाजातील फार मोठे व्यक्तिमत्त्व होते, असे बागवे म्हणाले. पत्रकार, उद्योजक, समाजसुधारक व राजकारणी अशा विविध क्षेत्रात त्यांनी बुद्धीची चमक दाखवली असे ते म्हणाले. काँग्रेसला बहुजन समाजाचा पाठिंबा मिळवून देण्यात जेधे यांचे फार मोठे योगदान आहे, असे रोहित टिळक यांनी सांगितले. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी अखेरपर्यंत काम केले. प्रत्येक चळवळीतही ते अग्रभागी होते, असे टिळक म्हणाले
केशवराव जेधे यांचे पणतू कान्होजी दयानंद जेधे, रायभान जेधे, वीरेन जेधे, अक्षय माने यांनी संयोजन केले. काँग्रेस भवनमध्येही जेधे यांची जयंती साजरी केली. शहराध्यक्ष बागवे यांनी जेधे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सचिन आडेकर, गाडेकर, पोपटराव पाटोळे उपस्थित होते.