अजित पवार यांच्या मागणीबाबत पक्षातील प्रमुख लोक निर्णय घेतील- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 11:30 AM2023-06-26T11:30:45+5:302023-06-26T11:31:35+5:30

त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर पक्षातील प्रमुख लोक बसून त्यातून निर्णय होईल,असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले...

Key people in the party will take a decision on Ajit Pawar's demand - Sharad Pawar | अजित पवार यांच्या मागणीबाबत पक्षातील प्रमुख लोक निर्णय घेतील- शरद पवार

अजित पवार यांच्या मागणीबाबत पक्षातील प्रमुख लोक निर्णय घेतील- शरद पवार

googlenewsNext

बारामती (पुणे) : पक्ष संघटनेच्या कामात सर्वांनी लक्ष घालावे अशी प्रत्येकाचीच भावना आहे. तेच मत अजित पवार यांनी पक्षाच्या व्यासपीठावर व्यक्त केले आहे, त्यात यापेक्षा वेगळे काही नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी पक्ष संघटनेतील पदाच्या केलेल्या मागणीबाबत निर्णय मी एकटा घेत नाही. त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर पक्षातील प्रमुख लोक बसून त्यातून निर्णय होईल,असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

बारामतीत सोमवारी (दि. २६) सकाळी पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट मत व्यक्त केले. यावेळी पवार यांनी, फडणवीस यांच्या एकनाथ शिंदे यांनी केली तर बेईमानी व पवारांनी केली तर मुत्सुदेगिरी या वक्तव्यावर देखील परखडपणे मत व्यक्त केले. यावेळी पवार यांनी मी बेईमानी कधी केली हे त्यांनी सांगावे, असा सवाल केला. १९७७ साली आम्ही सरकार बनवले. पण त्यात भाजप माझ्यासोबत होता. त्यामुळे त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहीत नसेल. त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी जे सरकार बनवले ते सगळ्यांना घेऊन केले. त्यात त्यावेळचा जनसंघ, त्याचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते, आणखी काही सदस्य होते. मला वाटते ते प्राथमिक शाळेत कदाचित असतील त्यामुळे त्यांना त्या काळातील माहिती नसेल. त्यामुळे ते अज्ञानापोटी अशी स्टेटमेंट करतात यापेक्षा जास्त काही भाष्य करायची गरज नाही,असा टोला पवार यांनी लगावला.

पाटण्यातील बैठकीत १९ पंतप्रधान एकत्र आले होते, या विरोधकांच्या टीकेवर पवार म्हणाले, हे त्यांचे पोरकटपणाचे भाष्य आहे. या बैठकीत पंतप्रधान या विषयाची चर्चा झाली नाही. महागाई, बेरोजगारी, सांप्रदायिक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल बैठकीत चर्चा झाली. कोणत्याही राज्यात जाती-धर्मात मतभेद वाढले तर समाजाच्या दृष्टीने ते चांगले नाही. सत्ताधारी भाजप तशी पावले टाकत आहे. या सगळ्या गोष्टींना आवर घालण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, हा बैठकीत चर्चेचा विषय होता. पण गेली दोन-तीन दिवस अनेक तथाकथित लोक यावर टीका करत आहेत. लोकशाहीत बैठकीची परवानगी नाही का, असा प्रश्न पवार यांनी केला. केसीआरने महाराष्ट्रातील कांद्यांच्या प्रश्नात हात घातल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, संबंध राज्याचा विचार केला तर कांदा हे पीक फक्त पश्चिम महाराष्ट्रात होतो. नाशिक, धुळे व तीन चार जिल्ह्यांत जिरायत शेतकरी कांदा पिक घेतात. काही वृत्तपत्रात अशी माहिती आली आहे की, येथील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी हैद्राबादला नेला. तेथे त्यांची फजिती झाली. त्यामुळे हे थोडे राजकीयदृष्ट्या वेगळे चित्र दाखवू शकतो, एवढाच त्यांचा प्रयत्न. त्यांना सेवा करायची असेल तर त्यांचे स्वागत आहे. केसीआर करत असलेल्या शक्तीप्रदर्शनाबाबत ते म्हणाले, त्यांच्याकडे साधन, संपत्तीची चिंता नाही. त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे. आगामी काळात ते आव्हान निर्माण करतील का हे निवडणूकीतच दिसेल,असे पवार म्हणाले.

...मॅच्युअर पॉलिटीक्सची कमतरता
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बैठकीची गरज काय होती. पण मुंबईमध्ये मित्र पक्षांची बैठक भाजप घेणार असल्याची बातमी वाचण्यात आली. मग तुम्हाला बैठका घेता येतात इतरांनी घेतल्या तर त्यात चुकीचे काय. मॅच्युअर पॉलिटीक्सची कमतरता आहे, एवढेच मी याबाबत म्हणू शकेल, असे शरद पवार म्हणाले.

...त्यांचे वाचन कमी असेल.
राष्ट्रवादीत ओबीसींना पुरेशी संधी मिळत नसल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, आमच्या पक्षाचे राज्याचे पहिले अध्यक्ष छगन भुजबळ होते. नंतरच्या काळात मधुकर पिचड, सुनील तटकरे अशा अनेकांना संधी मिळाली. त्यामुळे याबाबत विरोधकांकडून आरोप होत असतील तर त्यांचे वाचन कमी असेल. या बाबींची नोंद न घेता ते विधाने करतात. पण लोकांना सगळे माहित असते,असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लगावला.

यंदाच्या पावसाळ्यात अलनिनोचा प्रभाव राहिल का यासंबंधीच्या प्रश्नावर ते म्हणाले, गेल्या पाच सहा दिवसांपूवीर्ची स्थिती व आजची स्थिती यात फरक आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी अतिशय चिंतेचे वातावरण राज्यात होते. पाऊस नव्हता. पण गेल्या दोन दिवसात हवामानात बदल दिसतो आहे. त्याचा परिणाम कुठे ना कुठे पाऊस होताना दिसतो आहे. हवामान खात्याचा अहवाल आहे, तो या पाच दिवसांसाठी अनुकुल असल्याचे पवार म्हणाले.

Web Title: Key people in the party will take a decision on Ajit Pawar's demand - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.