महापालिकेच्या स्थायी समितीच्या चाव्या महिलांच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 03:49 PM2020-02-17T15:49:01+5:302020-02-17T15:49:14+5:30
सोळा सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीमध्ये महिलाराज
पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ जागांसाठी सोमवारी घेण्यात आलेल्या मुख्य सभेमध्ये नव्या सदस्यांची निवड करण्यात आली. भाजपाने त्यांच्या वाट्याच्या चारही जागांवर महिलांना संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादीने दोन आणि काँग्रेसने एका जागेवर महिलेला संधी दिली आहे. त्यामुळे सोळा सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीमध्ये महिलाराज आले आहे.
भाजपकडून नगरसेविका वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, उज्वला जंगले, सुनिता गलांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीने अमृता बाबर व नंदा लोणकर यांना संधी दिली असून काँग्रेसकडून लता राजगुरू यांची निवड करण्यात आली आहे. तर शिवसेनेने नगरसेवक बाळा ओसवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
भाजपाच्या वर्षा तापकीर या महापौर पदासाठी इच्छुक होत्या. तर राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही होत्या. परन्तु, दोन्ही पक्षांनी संधी न दिल्याने त्या नाराज असल्याची चर्चा होती. दोन्ही पक्षांनी आपापल्या नगरसेवकांची स्थायी समितीवर वर्णी लावत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे