लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चितेवर झोपून आंदोलन करणे ही केवळ स्टंटबाजी आहे. प्रभाग क्रमांक चारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चारही नगरसेवक अपयश झाकण्यासाठी सतत विरोधात असल्याचे दाखवून नागरिकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतात. राज्याच्या सत्तेत सहकारी असलेल्या शिवसेनेनेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांवर स्टंटबाजीचा हा आरोप केला आहे.
खराडी गावातील स्मशानभूमीचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. याचा निषेध करत नगरसेवक भैयासाहेब जाधव यांनी चितेवर झोपून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.
शिवसेनेचे सहचिटणीस राजाभाऊ चौधरी यांनी सांगितले की, विरोधी पक्षातील नगरसेवक आहोत असे नागरिकांना सातत्याने सांगितले जाते. मात्र, याच नगरसेवकांना पालिकेचा निधी किती मिळतो, हे जनतेला सांगत नाहीत. त्यांच्या कार्यकाळात किती मोठी कामे केली, हा संशोधनाचा विषय आहे. शाळेचा गणवेश, डॉक्टरांचा गणवेश परिधान करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम हे नगरसेवक फक्त करतात.
खराडीतील ‘राष्ट्रवादी’चे नगरसेवक भैयासाहेब जाधव, महेंद्र पठारे, सुमन पठारे व संजीला पठारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, जर कोणाला ही स्टंटबाजी वाटत असेल आणि त्यातून नागरिकांचा प्रश्न सुटणार असेल तर त्यात आम्ही समाधानी आहोत. स्मशानभूमीचे तरी राजकारण करू नये. आंदोलन केवळ जनतेच्या हितासाठीच केले जाते. नागरिक सुज्ञ आहेत. महापालिकेने एक महिन्यात बजेट देऊन काम केले नाही तर आंदोलन केले जाईल.
चौकट
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमुख्यमंत्री आहे. असे असताना देखील खराडीत सत्ताधारी पक्षातली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना या दोन्ही पक्षांचे नेते निवडणूक एकत्रित लढायची की स्वतंत्र याचा विचार अजून करत आहेत. त्याआधीच स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये ठिणग्या उडताना दिसत आहेत.