पुणे : खडक पोलिसांनी सराईत वाहनचोरास अटक करून त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या. यापूर्वी त्याच्यावर खडक, विश्रामबाग, दत्तवाडी, कोथरूड, लष्कर आणि वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरी आणि वाहन चोरीचे मिळून तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत.
त्याने चार दुचाकी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून, तर एक दुचाकी समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केली आहे. अभिषेक ऊर्फ पप्पू शरद पवार (वय ३३, रा. गुरुवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार समीर माळवदकर व फहीम सैय्यद यांना माहिती मिळाली की, पवार याने शुक्रवार पेठ येथून गाडी चोरी केली असून, तो घोरपडे पेठ येथे थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई करत पवार याला अटक केली. त्याच्याकडून स्वारगेट येथील कॅनॉल शेजारी ठेवलेल्या १ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या पाच गाड्या जप्त करण्यात आल्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हर्षवर्धन गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे प्रभारी उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहप्रभारी उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस अंमलदार फहिम सय्यद, संदीप पाटील, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राहुल मोरे, रवी लोखंडे, हिम्मत होळकर, अजिज बेग, सागर केकाणे, अमेय रसाळ, अनिकेत बाबर यांनी ही कारवाई केली.