पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील मोठ्या भागाला पाणी पुरवठ्या करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ९४.४४ टक्क्यांवर आला असून मुठा नदीत ५९९२ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.हा पाणीसाठा बघता यंदा शहराच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव,टेमघर आणि खडकवासला धरणक्षेत्रात गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस सुरु असून धरणसाठ्याने नव्वदीपार केली आहे.खडकवासला धरण साखळीतील खडकवासला धरण १०० टक्के भरले असून त्यापाठोपाठ पानशेत धरणही भरण्याच्या मार्गावर आहे.धरण भागात पडणाऱ्या पावसामुळे भात लावणी पूर्ण झाली आहे. या धरण साखळीवर पुणे शहराचे वर्षभराच्या पाण्याचे नियोजन असल्यामुळे शहरानेही सुटकेचा निश्वास सोडला आहे. पावसाचा जोर असाच सुरु राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.