पुणे : पुणे शहरात मागील २ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु झाला आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिल्याचे दिसून आले आहे. खडकवासला धरण प्रकल्पात ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. तर खडकवासला धरण आतापर्यंत तब्बल ९६ टक्के भरले आहे. आज पहाटे ३ वाजल्यापासून खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये २००० क्युसेक ने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २०० क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी ६.३० वा. ४७०८ क्यूसेक्स करण्यात आला. त्यानंतर मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा ४७०८ क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी ७.०० वा. ९४१६ क्यूसेक्स करण्यात आला. सकाळी ६ वाजेपर्यंत पानशेत, वरसगाव, टेमघर, खडकवासला चारही धरण मिळून १७.८२ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असूव्य न ६१.१२ टक्के पाणी जमा झाले आहे.
आज पहाटेपासून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरु असल्याने कोणीही नदीपात्रात उतरू नये असे पाटबंधारे विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत अशी सूचनाही करण्यात आली आहे, नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.