पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्हयाच्या धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खडकवासला धरणासह जिल्हयातील इतर धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मंगळवारी सुद्धा खडकवासला भागात पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने धरण १०० टक्के भरले होते. पुणेकरांवरचे पाणीकपातीची टांगती तलवार दूर झाली आहे. तसेच मुठा नदीत गुरुवारी दुपारी १२ वाजता ९ हजार ५०० क्युसेकने पाणी विसर्ग करण्यात आला आहे.
यावर्षी जून- जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने धरणे भरणार का असा मोठा गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता. पाऊसच थांबल्याने बहुतेक सर्वच धरणांच्या पाणीसाठ्याने तळ गाठला होता. परंतु, गेल्या दहा बारा दिवसांपासून पुणे जिल्हयाच्या धरणपाणलोट क्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या खडकवासला प्रकल्पातील अन्य तीन धरणे सरासरी पपन्नास टक्क्यांच्या पुढे भरली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणार्या चारही धरणात संततधार पावसामुळे १८.८० टीएमसी आणि ६४.५२ इतके टक्के धरणे भरली आहेत.गतवर्षी ही चारही धरणे शंभर टक्के भरली होती. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने या धरणामध्ये १.९७ अब्ज घनफूट ( टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. अन्य धरणांपैकी टेमघर धरणात १.७० टीएमसी, वरसगाव धरणामध्ये ७.५१ टीएमसी, पानशेत धरणामध्ये ७.६२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.