पुणे : पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गुरूवारी दिवसभरण खडकवासला प्रकल्पातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. यामुळे खडकवासला धरण ओव्हर फ्लो झाले असून, गुरुवारी रात्री उशिरा १६,५०० क्युसेकने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत,वरसगाव, टेमघर,पवना, नीरा देवघर, चासकमान, भाटघर,उजनी आदी धरण क्षेत्रात बऱ्यापैकी पावसाची संततधार सुरु असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीतील पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे.
गुरुवारी ( दि.१३) दुपारी १२ वाजेनंतर ९,४१५ क्युसेकने मुठा नदीत विसर्ग करण्यास सुरूवात करण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता धरणातून नदीत ११ हजार ७०५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले.आणि पावसाचा जोर कायम राहिल्याने रात्री पाण्याचा विसर्ग १६ हजारांपर्यंत वाढविण्यात आला.
पोलीस तसेच महापालिका प्रशासनाकडून पुणेकरांनी नदीपात्रात जाऊ नये अथवा फिरू नये, तसेच नदी पात्रात वाहने पार्किंग देखील करू नये असे आवाहन करण्यात आले होते.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे हा विसर्ग करण्यात आला असून संततधार पाऊस कायम राहिल्यास हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी केले आहे.