पुणे : तरुण-तरुणी धुलिवंदन आणि रंगपंचमीला रंग खेळून खडकवासला जलाशयात उतरतात. या रंगांमुळे जलाशय दूषित होत आहे. हिंदू जनजागृती समितीच्यावतीने मंगळवारी (दि. १०) आणि शुक्रवारी (दि. १३) खडकवासला जलाशय रक्षण अभियानांतर्गत सकाळी ९ ते ७ या वेळेत ही खडकवासला जलाशय रक्षण मोहीम राबवून ते दूषित होण्यापासून थांबवणार आहे. हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सनातन संस्थेच्या डॉ. ज्योती काळे, रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर, गार्गी फाउंडेशनचे विजय गावडे, खडकवासला ग्रामपंचायत सदस्य विजय कोल्हे आदी उपस्थित होते. गोखले म्हणाले, की हिंदू जनजागृती समिती मागील १७ वर्षांपासून हे अभियान राबवित आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा जलाशय दूषित करणे, हे सर्वथा अयोग्य आहे. हे थांबवण्यासाठी अभियानात सहभागी होणारे कार्यकर्ते जलाशयाभोवती मानवी साखळी करून जलाशयाकडे येणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करतील. हिंदू जनजागृती समितीच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी, तहसीलदार, पाटबंधारे विभाग, खडकवासला ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले आहे. अभियानासाठी प्रशासन सर्वतोपरी साहाय्य करेल. त्यावेळी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करू, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पेटकर म्हणाल्या, की काही वर्षांपूर्वी युवक-युवती रंग खेळून जलाशयात उतरत होते. हे अभियान सुरू झाल्यावर ते जागरूक झाले आहेत. तसेच येथे घडणाऱ्या गैरप्रकारांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ०००
धुलिवंदन आणि रंगपंचमीला खडकवासला जलाशय दूषित होण्यापासून थांबवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 6:55 PM
जलाशयाभोवती मानवी साखळी करून जलाशयाकडे येणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन
ठळक मुद्देपुणे जिल्हाधिकारी, तहसीलदार, खडकवासला ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन