पुणे : खडकवासला धरण प्रकल्पातून दौंड, इंदापूर व बारामतीमधील काही ग्रामीण भागासाठी सोडलेले आवर्तन अंतिम टप्प्यात असून येत्या शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी धरणातील आवर्तन बंद केले जाणार आहे. कालव्यातून सुमारे ३० दिवस ग्रामीण नागरिकांना पाणीसाठी व शेतीसाठी पाणी सोडण्यात आले, असे खडकवासला धरण प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्पात तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यातच पुणे महापालिकेचा पाणी वापर वाढल्याने यंदा ग्रामीण भागाला दिले जाणारे एक आवर्तन रद्द करण्यात आले आहे. गेल्या १२ मार्चपासून ग्रामीण भागासाठी या हंगामातील शेवटचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले होते. जलसंपदा विभागाकडून ७ मे पर्यंत (२७ दिवस) हे आवर्तन दिले जाणार होते. मात्र, त्यात तीन दिवस वाढ करून १० मे पर्यंत पाणी सोडले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ग्रामीण भागास २.६८ टीएमसी पाणी दिले जाणार होते. परंतु, तीन दिवस अधिक पाणी सोडल्याने ग्रामीण भागाला सुमारे तीन टीएमसी पाणी देण्यात आले. दरवर्षी ग्रामीण भागाला उन्हाळ्यातील आवर्तन सोडताना ४ ते ४.५ टीएमसी पाणी दिले जाते. मात्र, यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने आवर्तनात कपात केली आहे.---खडकवासला धरण प्रकल्पात ५ टीएमसी पाणी खडकवासला धरण प्रकल्पात गुरूवारी (दि.९) ५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षी ९ मे रोजी धरणात ८.०७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदा धरणात तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे. टेमघर धरणाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे टेमघरमध्ये सध्या शून्य टीएमसी पाणी आहे. खडकवासला धरणात ०.५३ टीएमसी, पानशेतमध्ये २.९६ टीएमसी आणि वरसगाव धरणात १.५२ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.
खडकवासला धरणातील आर्वतन उद्या होणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 8:22 PM
दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्पात तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे.
ठळक मुद्देग्रामीण भागाला सुमारे तीन टीएमसी पाणी देण्यात आले.यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने आवर्तनात कपात टेमघर धरणाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे टेमघरमध्ये सध्या शून्य टीएमसी पाणी