पुणे : शिवाजी रस्त्यावरील लालमहाल ते बुधवार चौक हा पट्टा आजही प्रचंड खड्ड्यांनी व्यापलेला आहे. तसेच या पट्ट्यांवरील निम्म्याच्यावर ड्रेनेज हे उघडीच आहेत. ड्रेनेजच्या शेजारीच मोठ-मोठे खड्डे असून या उघड्या ड्रेनेजमुळे रोगराईचे प्रमाणही वाढले आहे.या भागात नेहमी वाहतूककोंडीचा प्रश्नही दिवसभरात अनेकवेळा उद्भवतो. नागरिकांना रस्ता ओलांडताना करावी लागणारी कसरत, वाहनचालकांची खड्डे चुकविण्यासाठी चालणारी धरपड यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार, असा संतप्त सवाल नागरिक आणि व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातला हा प्रमुख मार्ग आहे. शनिवारवाडा, लालमहाल, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर अशा प्रेक्षणीय स्थळांनी व्यापलेला आहे. तसेच हा रस्ता शहराच्या प्रमुख उपनगरांना जोडणारा असल्याने यावरील वाहतूक ही कायम वाढणारी आहे. पहाटे ४ ते रात्री १ पर्यंत या रस्त्यावरून अत्यंत वर्दळ असते. महापालिकेत अनेक सत्तांतरे आजपर्यंत झाली पण कुणीही या रस्त्याचा प्रश्न गांभीर्याने घेतलेला नाही. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ता सुरक्षा व प्रवासाच्या दृष्टीने मोठा चिंतेचा विषय आहे.ताहेर अत्तरवाले यांनी सांगितले, महापालिका इथून काही अंतरावरच आहे. तसेच पालिकेचे अधिकारी, राजकीय नेते सर्व याच रस्त्यावरून प्रवास करतात. परंतु त्यांना ही समस्या गांभीर्याने घ्यावी, असे आजतागायत वाटले नाही.आजपर्यंत या ठिकाणी घडलेल्या कित्येक अपघाताच्या घटनांमध्ये अनेक व्यक्तींचे बळी गेले आणि शारीरिक नुकसानही सोसावे लागले आहे. समोर दिसणाºया प्रश्नांविरुद्ध कुणाकडे व कितीवेळा दाद मागायची, हा प्रश्न आमच्या मनात उभा राहतो. कारण कोणतेही राजकीय नेते निवडणुकीत मते मागण्याकरिता आमच्याकडे येतात. आश्वासने देतात परंतु पुढच्या काही वर्षात ते कधीही परिसरात फिरकतदेखील नाही.
शिवाजी रस्त्यावर खड्डेच खड्डे; वाहतूककोंडीचा प्रश्न नित्याचाच; ठिकठिकाणी ब्लॉक उखडलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 7:08 AM