पुणे :खडकी येथील शाळेने त्यांच्या विद्यार्थिनीला अनोळखी महिलेकडे सोपवलेच कसे? शाळेने पालकांना फोन का केला नाही असे अनेक प्रश्न या घटनेमध्ये आहेत. त्यामुळे याबाबत चौकशी समिती नेमण्यात येईल आणि शाळेचा गहाळ कारभार समोर आल्यास शाळेवर कारवाई करणार अशी माहिती महापालिकेच्या प्रशासनाधिकारी मीनाक्षी राऊत यांनी दिली.
खडकी येथील शाळेत विद्यार्थिनीचे अपहरण होण्याचा प्रयत्न उघड झाल्याने शहरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय प्रशासनाची विद्यार्थी सुरक्षेबाबतची लोकमतने प्रशासनाची भूमिका जाणून घेतली. त्यावेळी महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी राऊत यांनी कारवाईचे सुतोवाच केले.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आणि पोक्सो कायद्याबाबत शाळांना माहिती मिळावी यासाठी महापालिका शिक्षण विभाग आणि पोलीस आयुक्तालय यांच्यावतीने विभागीय स्तरावर शहरात दोन ठिकाणी कार्यशाळा झाल्या आहेत. पुढेही कार्यशाळा होतील. त्यामध्ये शाळांना गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी शाळेने केलीच पाहिजे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई अटळ आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पालकांचे लेखी पत्र आवश्यक : शिक्षण उपसंचालक
मुलांना शाळेतून घरी नेण्यासाठी किंवा बस थांब्यावरून घरी नेण्यासाठी कोण येणार आहे त्याचे ओळखपत्र आणि लेखी पत्र शाळांना दिले पाहिजे. त्यानुसार शाळेतून मुले सोडताना त्याच पत्रात नमूद व्यक्तींकडेच मुलांना सुपुर्द करण्याची जबाबदारी वर्गशिक्षकांची आहे. त्यामध्ये शाळांनी हलगर्जीपणा केला असेल तर त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात येतील अशी माहिती पुणे शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली.