पुणे: माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना नुकतीच भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळातील पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच ते मंत्रिमंडळात दाखल झाले तर पक्षाला व सरकारला त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. खडसे मंत्री झाले तर आनंदच होणार आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया जलसंधारण आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. गिरीष महाजन यांची ससून रुग्णालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. महाजन म्हणाले , जमीन खरेदी प्रकरणी खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल एसीबीने न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे खडसेंचा मंत्रिमंडळातील पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे वक्तव्य करतानाच या बाबतचा निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील असे असे सांगायला देखील ते विसरले नाही.
यापूर्वी खडसे व महाजन यांच्यामध्ये सातत्याने कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याचे चित्र आपल्याला वारंवार पाहायला मिळाले आहे. मात्र, महाजन यांच्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात खडसेंच्या मंत्रिमंडळातील चर्चांना उधाण आले आले आहे. त्यापार्श्वभूमीवर महाजन यांचे वाक्य निश्चितच नवीन राजकीय घडामोडींची नांदी ठरु शकते.
...................... ससून रुग्णालयाची नवीन इमारतीचे पुढील दीड वर्षात लोकार्पणअद्ययावत यंत्रणेमुळे सर्वच स्तरांवरुन ससून रुग्णालयाकडे लोकांचा कल वाढतो आहे. ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीमुळे रुग्णांना अजून चांगल्या दर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवीन इमारतीचा रखडलेला प्रश्न पुढील दीड वर्षात मार्गी लावण्यात येईल. तसेच महात्मा फुले जीवनदायी योजनेत शासकीय रुग्णालयात उपचार झाल्यास संबंधित डॉक्टरला प्रोत्साहनपर निधी देण्यात येणार असल्याची माहिती देखील महाजन यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.