पुणे : ‘सैराट झालं जी...’ म्हणून तरुणाई मुक्त झाली असली तरी ‘खानदान की इज्जत’साठी प्रेमीजनांची ताटातूट करण्याचे प्रकार होतच आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी सकारात्मकपणे प्रयत्न करून एका दांपत्याच्या रेशीमगाठी पुन्हा जुळविल्या. खऱ्या प्रेमाला एकत्र आणण्यासाठी बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा दबावही मानला नाही. मराठवाड्यातील एका राजकीय कुटुंबातील तरुणीची पुण्यात शिक्षणासाठी आली असता एकाशी मैत्री झाली. यातूनच प्रेम बहले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आळंदीला जाऊन त्यांनी लग्नही केले. तरुणाच्या कुटुंबियांची या लग्नाला संमती होती. मुलीने मात्र माहेरच्यांकडून ही बाब लपवली होती. परंतु, तिच्या सासऱ्यांनी माहेरच्यांना लग्नाबाबत सांगावे असा आग्रह धरला. मुंबईमध्ये असलेल्या नातेवाईक डॉक्टर दाम्पत्याला लग्नाबाबत सांगताच ते पुण्यात आले. त्यांनी तरुणीचे लग्न झाल्याची खात्री करुन तिच्या चुलत्यांना याची माहिती कळवली. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हते. वडील लहानपणीच गेल्याने राजकीय पदाधिकारी असलेल्या चुलत्याने तिचे संगोपन केले होते. इमोशनल ब्लॅकमेल करीत आईने चुलत्याला हृदयविकाराचा अॅटॅक आल्याची बतावणी करून मुलीला घरी नेते म्हणून सांगितले. पतीला संशय असल्याने त्याने परत सोडण्याबाबत लेखी घेतले होते. त्याप्रमाणे आई मुलीला घेऊन गेली. मात्र, त्यानंतर एमबीए झालेल्या या उच्चशिक्षित तरुणीला तब्बल अडीच महिने डांबून ठेवले. ही तरुणी आजी आणि मोलकरणीच्या मोबाईलवरून पतीला मेसेज पाठवीत होती. वकील असलेल्या पतीने याबाबत परिमंडल दोनचे उपायुक्त पंकज डहाणे यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यानुसार, मुलीसह तिचे चुलते आणि आईला पुण्यात बोलावून घेण्यात आले. प्रवासात असतानाच चुलते आणि आईने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने या मुलीने माहेरी रहायचे असल्याचा जबाब दिला. त्यामुळे तिला त्यांच्यासोबत परत पाठवावे लागले. (प्रतिनिधी)
‘खाकी’मुळे जुळले जीवनगाणे
By admin | Published: July 12, 2016 1:36 AM