पुणे - पोलिसांकडे नेहमीच नकारात्मक नजरेने पाहिले जाते. पोलीस म्हणजे लाचखोर, भ्रष्ट आणि सर्वसामान्यांना छळणारे, अशीच प्रतिमा चित्रपट आणि माध्यमांतून उभारली जाते. केवळ काही पोलिसांच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलावर शिंतोडे उडविण्यात येतात. मात्र, खाकी वर्दीतही एक माणस लपला असून या खाकी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जगाला दाखवले. येथील आठ पोलिसांनी स्वखर्चाने एका आजीबाईला सोन्याच्या पाटल्या चक्क विकत घेऊन दिल्या.
पिंपरी चिंचवडच्या सांगवी पोलीस स्थानकात चकरा मारुन 80 वर्षीय आजीबाई थकल्या होत्या. आपल्या सोन्याच्या पाटल्या चोरीला गेल्याची तक्रार या आजीबाईंनी पोलिसात दिली होती. कष्टानं अन् हौसेनं केलेल्या तीन तोळे सोन्याच्या पाटल्या आज नाहीतर, उद्या मिळतील. पोलीस चोराचा छडा लावतील अशी भोळी आशा या आजीबाईंना होती. त्यामुळे आजीबाई सांगवी पोलीस स्टेशनच्या चकरा मारत. मात्र, आजीबाईच्या पाटल्या शोधण्यात पोलिसांना अपयश आले. त्यानंतर, खाकी वर्दीतली माणुसकी जागली. येथील सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांच्यासह आठ पोलिसांनी स्वखर्चाने पाटल्या विकत घेऊन या आजीबाईंना दिल्या. पोलिसांचे हे प्रेम पाहून आजीबाईच्या डोळ्यात नकळत अश्रू तरळले.
वयाच्या 14 व्या वर्षी लग्नबंधनात अडकलेल्या शांताबाईंचा केवळ चार वर्षात घटस्फोट झाला. त्यानंतर काही वर्षे माता-पित्याकड राहिल्या. पण, नियतीला तेही मान्य नव्हते. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर शांताबाई पोरक्या झाल्या. तर सख्ख्या भावानेही घरातून हाकलून दिले. त्यानंतर, नशिबी आली ती वाणवाच. मात्र, तरीही स्वकष्टावर खंबीरपणे जीवनप्रवास करत आजीबाईनं आयुष्य जगलं. याच काळात कष्टानं कामवलेलं हे धन चोरानं लुटलं. मात्र, परक्या खाकीतल्या या माणुसकीने दिलेला आनंद आजीबाईच्या डोळ्यात तरळताना पोलिसांचेही डोळे पाणावले. खरचं, महाराष्ट्र पोलिस दलात अशीच माणूसकीला जपणारी माणसे आहेत, म्हणूनच कधी पंढरीच्या वारीत वारकऱ्यांना घास भरवणारा पोलीस दिसतो, तर कधी मोर्चात जमिनीवर बसून हातात भाकरी घेऊन खाणारा कर्तव्यदक्ष महाराष्ट्र पोलीस सर्वांनाचा भावतो.