पुणे : रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहोचवण्यास रिक्षाचालकांनी नकार दिला. मात्र, ही बाब पेट्रोलिंग करणाऱ्या मुंढवा पोलिसांना समजताच त्यांनी दोन्ही अपघातग्रस्तांना गस्तीच्या वाहनातूनच रुग्णालयात पोहोचवले. पोलिसांनी दाखलेल्या माणुसकीमुळे दोन्ही अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळू शकले. मुंढवा पोलीस केशवनगर भागात पेट्रोलिंग करत असताना त्यांना अनुजा बापू पवार यांनी येऊन
कळवले, की त्यांची मुलगी योगीता व शेजारी राहणारी महिला रेणुकामाता मंदिर येथे दुचाकीवरुन पडून जखमी झाल्या आहेत. त्यांना रिक्षाचालक रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यास नकार देत आहेत. ही माहिती मिळताच पोलीस हवालदार एस. एल. मगर, वाघोले आणि पोलीस शिपाई सोडनवर यांनी जखमींना पेट्रोलिंगच्या गाडीत बसवले. यानंतर त्यांना खराडी परिसरातील एकाखासगी रुग्णालयात दाखल करुन डॉक्टरांना उपचार करण्यास सांगितले. जखमींना तातडीची मदत मिळाल्याने जीवदान मिळाले.