पुणे : खलिस्तानवाद चळवळीशी संबंध असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या हरपालिसंग प्रतापसिंग नाईक याचा २० देशांतील लोकांशी संपर्क असल्याचे तपासातून पुढे आले आहे.
पोलीस कोठडीची मुदत संपल्याने एटीएसने त्याला विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांचे न्यायालयात हजर केले होते, त्या वेळी त्याची पोलीस कोठडीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आलीे. हरपालिसंग याने दहशतवादी टोळी स्थापन करून खलिस्तानच्या निर्मितीसाठी जेलमधील आरोपी सोडविण्याची व हत्यारे गोळा करण्याची तयारी केल्याचे त्याच्या सोशल मीडिया आणि मोबाईल डेटाच्या विश्लेषणातून समोर आले आहे. बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानवादी संघटनेशी त्याचे संबंध असल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत अधिक तपास करण्याकरिता एटीएसची पथके कर्नाटक व पंजाब येथे रवाना झाली आहेत. त्याचा एक साथीदार मोईन खान हा पंजाबमधील सरहद पोलीस ठाण्यामध्ये शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटकेत असून त्याला सदर गुन्ह्यात ताब्यात घ्यायचे आहे. त्यादृष्टीने एटीएसला दोघांची समोरासमोर चौकशी करायची आहे.
पाकिस्तान, सौदी अरेबिया येथील लोकांच्या संर्पकात तो सातत्याने असल्याचे त्याचे मोबाईलमधील डेटातून निष्पन्न झाले आहे. पंजाब, गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांत तो राहत होता. त्यादृष्टीने पुरावे गोळा करण्यात येत आहेत. त्याच्या आर्थिक व्यवहाराबाबत चौकशीसाठी बॅँक स्टेटमेंटची माहिती पडताळणी केली जात आहे. याप्रकरणी पाहिजे असलेला आरोपी गुरुजीत निज्जर (रा. सायप्रस देश) यालाही ताब्यात घेऊन चौकशी करायची आहे.आरोपीने सुरुवातीला दोनच फेसबुक खाती असल्याचे सांगितले; मात्र त्यानंतर पाच फेसबुक खाती त्याची मिळून आली असून त्यावर सुमारे पाच हजार लोकांशी संर्पकात असल्याचे स्पष्ट होते. त्याचा एक फेसबुक व जी-मेल डाटा घेतला असता, तो दोन जीबी डाटा मिळाला असून त्याचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्याबाबत आरोपीकडे विचारपूस करून त्याची शाहनिशा करायची आहे. यासाठी कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती.