म्हाळुंगे : गुटखा, तंबाखूसह सुगंधी सुपारी व पानमसाला विक्रीवर बंदी असताना चाकण परिसरात याचा साठा होत असल्याने चाकण पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीआय) मदतीने खालुंब्रे येथे शनिवारी (दि. २२) दुपारी टाकलेल्या छाप्यातून तब्बल दोन लाख सहा हजारांचा गुटखा, तंबाखू, सुंगधी सुपारी व पानमसाला जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या भागातील विविध ठिकाणी छापे मारण्यात येत होते.गौरीशंकर भुलचंद दुबे (वय १९, सध्या रा. खालुंब्रे, ता. खेड) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चाकण पोलिसांच्या विशेष पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने याविरोधात मोहीम हाती घेतली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे खालुंब्रे येथे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरीक्षक महेश मुंडे, अजय भापकर, सुदाम हरगुडे, संजय जरे, रमेश नाळे, मुश्ताक शेख आदींच्या पथकाने अचानक छापा मारला. या वेळी आरोपी गौरीशंकर याने हा गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी, स्वादयुक्त तंबाखू व तत्सम पदार्थ असा दोन लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल अवैधरीत्या साठवणूक करीत असतानाचे आढळून आले. पोलिसांनी गौरीशंकर दुबे यास ताब्यात घेऊन छाप्यात पकडलेला सर्व अवैध गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीआय) ताब्यात दिला आहे. औषध प्रशासन विभागाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. (वार्ताहर)
खालुंब्रेत २ लाखांचा गुटखा पकडला
By admin | Published: April 24, 2017 4:38 AM