लोणावळा : महाराष्ट्र शासनाच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत मंजुरी मिळालेल्या खंडाळा तलाव संवर्धन कामाला लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने बुधवारी सुरुवात करण्यात आली़ शासनाच्या तांत्रिक विभागाची मान्यता मिळण्यास उशीर झाल्याने सुमारे दीड वर्षापासून हा प्रकल्प रखडला होता़ आता ही मान्यता मिळाल्यानंतर तलावातील पाणी काढून तलाव कोरडे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़महाराष्ट्रातील तलाव, सरोवरे व मोठे जलाशय यांचे पर्यावरणदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या राज्य सरोवर संवर्धन योजनेमधून लोणावळा नगरपरिषद हद्दीतील खंडाळा तलाव संवर्धनासाठी शासनाने ५ कोटी ३३ लाख ६४ हजार ७०० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी ३२ लाख रुपये प्रत्यक्ष नगरपरिषदेकडे वर्ग केले आहेत. योजनेनुसार तलावाचा विकास करण्यासाठी पाण्यात प्रदूषण करणारे स्रोत निश्चित करून प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे, तलावात साचलेला गाळ काढणे, तलावाची गुणवत्ता टिकविण्यासाठी उपाययोजना करणे, पाण्याची गुणवत्ता सुधारणे, किनाऱ्याचे सौंदर्यीकरण, हरितम पट्टा विकसित करणे, बालउद्यान, नौकाविहार आदींचा यामध्ये समावेश आहे़ सहा पाणी पंपांच्या साह्याने तलावातील पाणी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ येत्या ४ ते ५ दिवसांत तलाव पूर्णपणे रिकामे करून गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे़ सर्व गाळ काढून झाल्यानंतर तलावाच्या चौफे र संरक्षण भिंत बांधत तलावात येणारे ड्रेनेज व गटारांचे पाणी बंद करण्यात येणार आहे़ पुढिल टप्प्यात नौकाविहार व मनोरंजन पार्कचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता नितीन अनगळ व खंडाळा विभागाचे नगरसेवक व बांधकाम सभापती प्रमोद गायकवाड यांनी सांगितले़ गायकवाड यांच्यासह अभियंता अनगळ, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर लगड, बांधकाम विभागाचे दत्तात्रय गायकवाड आदींनी तलावाची व कामाची पाहणी केली़ (वार्ताहर)
खंडाळा तलाव सुशोभीकरण सुरू
By admin | Published: May 07, 2015 5:05 AM