पिंपरी: एमायडीसीमधील कंपन्यांमध्ये माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली हप्ता वसुली करणाऱ्या खंडणी बहाद्दरास अटक करण्यात आली आहे. महाळुंगे पोलिसांनी हे कारवाई केली. काळुराम उर्फ अजय शंकर कौदरे (वय ३९), कैलास शंकर कौदरे (वय ४२, रा. खारोशी, ता. खेड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे एमायडीसी अंतर्गत कंपन्यांमध्ये माथाडी संघटनेच्या नावाखाली हप्ता वसुली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चौकशी केली असता, आरोपी अजय कौदरे हा माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली कामगार पुरविल्याचे भासवून कंपन्यांकडून खंडणी स्वरूपात हप्ता वसूल करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित कंपनी प्रशासनामधील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली. अजय कौदरे व त्याचे साथीदार यांनी कंपन्यांमध्ये येऊन संघटनेचे कामगार कंपनीत प्रत्यक्ष कामास नसताना ते कामावर असल्याचे दाखवून खंडणी वसूल करत होता. याबाबत कोठे वाच्यता केल्यास तुमची वाट लावीन तुमच्यापैकी एखाद्याला जिम जीव गमवावा लागेल. या भागात कंपनी कशी चालवतात ते बघून घेईन अशी धमकीही अजय कौदरे याने कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन सांगितल्यानंतर त्यांनी तक्रार केली. त्यानुसार अजय कौदरे व त्याचे साथीदार यांच्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अजय व कैलास कौदरे या दोघांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
'मोक्कां'तर्गत करणार कारवाई
कंपनी प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली न राहता हप्ता व खंडणी वसूल करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तक्रार द्यावी या तक्रारींची गंभीर दखल घेऊन पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. पिंपरी -चिंचवड माथाडी कामगार बोर्डाचे अधिकारी व कर्मचारी इतर कामगार संघटना व इतर कोणाचा सहभाग या गुन्ह्यात आढळून आल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम म्हणजेच 'मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया अवलंबण्यात येईल, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.