प्रयोग करा आणि आम्हाला पाठवा
जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ : विज्ञानदिनी उपक्रम
खोडद : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विज्ञान प्रदर्शन भरवता येत नाही म्हणून जनजागृतीसाठी घरच्या घरी प्रयोग करा आणि आम्हांला पाठवा, हा उपक्रम जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. डॉ. सी. व्ही. रामन यांना आगळीवेगळी आदरांजली वाहण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याची माहिती विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल यांनी दिली.
दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक डॉक्टर सी. व्ही. रामन यांना सन १९३० साली मिळाले. ज्या संशोधनाला नोबेल मिळाले तो विचार २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी प्रसिद्ध झाला. या दिवशी संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रश्नमंजूषा, निबंधलेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. मात्र या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घरी प्रयोग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी घरच्या घरी प्रयोग करून विज्ञानाचा आनंद घ्यावा. तसेच घरातील इतर व्यक्तींनाही आपण केलेले प्रयोग समजून सांगावेत, हा मूळ उद्देश या उपक्रमाचा आहे.
विद्यार्थ्यांनी प्रयोग गणित किंवा विज्ञान कोणत्याही विषयाचा करावा तसेच अभ्यासक्रमातील किंवा अभ्यासक्रमाच्या बाहेरचा जरी प्रयोग केला तरी चालेल. प्रयोग घरच्या घरी तयार करायचे असून प्रयोग तयार झाल्यानंतर त्याचा २ ते ३ मिनिटांचा व्हिडीओ रतिलाल बाबेल यांच्या ९८६०३८९९५६ या व्हॉट्सअॅपवर पाठवायचा आहे किंवा त्यांच्या फेसबुकवर टॅग करायचा आहे. निवडक प्रयोगांना रोख स्वरूपात बक्षीस, सन्मानपत्र आणि सर्व सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.