लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खराडी-चंदननगर प्रभाग क्रमांक ४ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. यामुळे नागरिक वैतागले असून कारवाई करण्याची मागणी करू लागले आहेत.
खराडी बाय पास, चौधरी वस्ती ते चंदननगर, टाटा गार्डन ते टोल नाका (नगर महामार्गावर), पंचशील टॉवर परिसर, खराडी गाव ते बायपास रस्ता, विडी कमागर वसाहत तसेच विविध भागातील अंतर्गत रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. पदपथावर नव्हे तर रस्त्यावरच दुकान लावून धंदा केला जात आहे. भाजी विक्रेत्यांसह इतर व्यवसायिक देखील रस्त्यावर बसून धंदा करू लागले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
भाजी मंडई पडल्या ओस
कोरोना काळात अनेकांनी रस्त्यावरच भाजी विक्री करणे सुरू केले आहे. लॉक आणि कोरोनाच्या कारणामुळे कारवाई करण्यात येत न्हवती. याचा फायदा घेऊन मुळ जागा सोडून रस्त्यावर बसल्याने धंदा केला जात आहे. त्यामुळे महापालिकेन लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या मंडई ओस पडल्या आहेत.
खराडी बाय रस्त्यावरच भरते फळ मार्केट
खराडी बायपास ते दर्ग्या ते टोल नका दरम्यान नगर महामार्गावरच फळ विक्रते बसतात. त्यांना विचारणा केली असता प्रत्येकी १०० शंभर रुपये एका खाजगी व्यक्तीकडून गोळा केले जातात. त्यामुळे येथे कोणती कायदेशीर कारवाई होत नाही, असे ‘लोकमत’ला सांगितले.
चौकट
राजकीय वरदहस्त, अधिकाऱ्यांची खाबुगिरी?
रस्तोरस्ती फोफावलेल्या बेकायदा अतिक्रमणांना कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, रस्त्यावरील विक्रेत्यांकडून कोण पैसे गोळा करते याची कुजबुज स्थानिकांमध्ये आहे. मात्र उघडपणे कोणी बोलत नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही ‘वाटा’ दिला जात असल्याने त्यांच्याकडूनही कारवाई होत नाही. तक्रारी केल्यावर चार दिवस कारवाईचे नाटक केले जाते, पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ या प्रकाराला नागरिक कंटाळून गेले आहेत. नागरिकांच्या संयमाची परिक्षा पाहायची की मोठी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहात आहे का, असा संतप्त सवाल केला जात आहे.