लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डॉक्टर्स फॉर बेगर्स ने भिक्षेक-यांच्या मागणा-या हातांना काम देण्यासाठी '' खराटा पलटण'' उभी केली. ही पलटण शहरातील अस्वच्छ भाग साफ करण्यास पुढे सरसावली आहे. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने भवानी पेठ येथील, कासेवाडी वसाहती समोरील संपूर्ण रस्ता स्वच्छतेसाठी या '' खराटा पलटण'' ला दिला आहे. ही पलटण या जागेचा कायापालट करून दाखविणार आहे.
''भिक्षेक-यांचा डॉकटर'' अशी ख्याती असलेल्या डॉ अभिजित सोनावणे यांनी ४० भिक्षेक-यांची टीम तयार करून त्यांना '' श्रमिक'' बनविले. पुण्यातील एखादा गलिच्छ भाग आम्हाला द्यावा आणि आमची खराटा पलटण त्या भागाचा कायापालट करेल अशी मागणी सोनावणे यांनी महापालिकेकडे केली होती. त्या मागणीची दखल घेत महापालिकेचे सहआयुक्त तामखेडे यांनी कासेवाडी वसाहतीसमोरील संपूर्ण रस्ता खराटा पलटण च्या ताब्यात दिला असल्याची माहिती डॉक्टर्स फॉर बेगर्स आणि सोहम ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ मनिषा अभिजित सोनावणे यांनी दिली.
या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच झाला. कासेवाडी वसाहती समोरील रस्त्याच्या फुटपाथवर विविध प्रकारचा कचरा पडला आहे. हा फूटपाथ सध्या वापरात नाही. फूटपाथ स्वच्छ करणे हे त्यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. परंतु खराटा पलटण हे आव्हान नक्की पेलेल असा विश्वास महापालिका सहआयुक्त केतकी घाटगे यांनी व्यक्त केला. आठवड्यातून दर शुक्रवारी आमची ४० लोकांची खराटा पलटण, आलटून-पालटून या संपूर्ण रस्त्याची स्वच्छता करणार असल्याचे डॉ सोनावणे यांनी सांगितले.
....