लोकमत न्यूज नेटवर्कओझर : जुन्नर तालुक्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामातील पिकाला पाण्याचा ताण पडला आहे. तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यातदेखील वाढ झालेली नाही.या वर्षी सहा जूनलाच पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्या. परंतु, पावसाने पुन्हा उघडीप दिल्यामुळे पेरण्या खोळबल्या होत्या. दरम्यान झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या. खरिपातील भुईमूग, सोयाबीन तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील आणे, शिंदेवाडी या भागातील बाजरी, उडीद, मठ, हुलगा या पिकांचा चांगला उतार झाला असून आता पाण्याची आवश्यकता आहे. तालुक्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. दिवसभर कधी कडक ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी पावसाच्या सरी पडतात, असा पावसाचा खेळ सुरू असल्यामुळे पिकांना पाणीटंचाई जाणवत आहे. या हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ न झाल्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या माणिकडोह धरणात १५ टक्के पाणीसाठा आहे.
पावसाअभावी खरीप पिके धोक्यात
By admin | Published: July 08, 2017 1:58 AM