पुणे : राज्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे खरिपातील पिकांच्या पेरण्यांना उशीर झाला. अनेक जिल्ह्यांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्यांना सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्याने काही ठिकाणीच दुबार पेरण्याचे संकट ओढावले. राज्यातील आठ तालुक्यांमध्ये केवळ २५ ते ५० टक्केच पाऊस झाला असल्याने व पेरण्यांचा हंगामही उलटून गेल्याने आता या ठिकाणी शेतकरी रबीची तयारी करत आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. दुसरीकडे राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सुमारे बारा लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.
राज्यात यंदा मान्सूनचे आगमन लांबले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने बहुतांश राज्यात हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना उशीर झाला. राज्यात सोयाबीन व कापूस या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक असून साधारण १५ जुलैपर्यंत या दोन्ही पिकांची लागवड करणे शक्य होते. याच काळात राज्यभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन व कापूस पिकांच्या पेरण्या झाल्या. याच काळात पश्चिम कोकण व पूर्व विदर्भात सर्वत्र व राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ठरावीक तालुक्यातच जोरदार पाऊस झाला. अन्यत्र पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. याच पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. काही तालुक्यांमध्ये मात्र या पेरण्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्याने पिके जळून गेली. अशा ठिकाणी विशेषत: सोयाबीन पिकाची दुबार पेरणी झाली. मात्र, हे क्षेत्र अतिशय कमी असल्याचे कृषी विभागाचे म्हटले आहे.
दुसरीकडे, राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये सुमारे ११ लाख ९६ हजार ९६६ हेक्टरवर अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार ७८० हेक्टरवर झाले. त्या खालोखाल यवतमाळ जिल्ह्यात २ लाख ९१ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, तर पावसामुळे राज्यात सात जिल्ह्यांतील ४३ हजार ३३६ हेक्टरवरील जमीन खरवडून गेली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या या क्षेत्रावरील पेरण्यासाठी आता योग्य काळ नसल्याने आता शेतकरी रबी हंगामासाठीच तयारी करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, राज्यातील पाच जिल्ह्यांतील ८ तालुक्यांत पावसाचे प्रमाण २५ ते ५० टक्क्यांपर्यंतच असल्याने येथे खरिपातील पेरण्या आता होणार नाहीत. या पुढील काळात या भागात पाऊस झाल्यास हे शेतकरी रबीची लागवड करतील, अशी माहितीही त्यांनी दिली. या तालुक्यांमध्ये नाशिकमधील चांदवड, नगरमधील श्रीरामपूर व राहुरी, पुणे जिल्ह्यातील बारामती- पुरंदर व हवेली, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव व कोल्हापूरमधील राधानगरी या तालुक्यांचा समावेश आहे.
राज्यातील पेरणी
सरासरी क्षेत्र : १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ हेक्टर
पेरणी झालेले क्षेत्र : १ कोटी ३० लाख ६५ हजार २५७ हेक्टर
टक्के : ९२ (सरासरीच्या तुलनेत)
विभागनिहाय पेरणी (टक्क्यांत)
कोकण : ८०, नाशिक : ९१, पुणे : ९०, कोल्हापूर : ७६, औरंगाबाद ९४, लातूर ९७ अमरावती ९६, नागपूर ८६.