पुणे-नाशिक या नव्याने सुरू असलेल्या महामार्गाच्या कामासाठी जाणारे मुरुमाचे डंपर खरपुडी (ता. खेड) येथील ग्रामस्थांनी आठ दिवसांपूर्वी आक्रमक होत अडवून होणारी मुरुमाची वाहतूक बंद केली. होती अवजड वाहतुकीमुळे रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत ठोस निर्णय होईपर्यंत वाहतूक न करण्याचा इशारा ग्रामस्थांनी ठेकेदाराला दिला होता. मात्र आता रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाहतुक सुरूच आहे. रात्रीच्या सुमारे ३ ते ४ डंपरद्वारे मुरुमाची वाहतूक होत असल्याने डांबरी रस्त्याची पुरती वाट लागली आहे. खरपुडी खंडोबा येथील अडीच किलोमीटर डांबरी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ४० ते ४५ टन डंपरद्वारे मुरुमाची वाहतूक होत असून ठिकाणी ठिकाणी रस्ता खचला आहे. रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्ता खचत असल्याने शेतकऱ्यांच्या पाईपलाईनही फुटत आहे. रस्त्यालगत असलेल्या ड्रेनेजलाईन फुटल्या आहेत. रात्रीच्या वेळी मुरूमाची यंत्राद्वारे खोदाई सुरू असल्याने नागरिकांना खोदाई करणाऱ्या आवाजाचा विनाकारण त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी होणारी वाहतूक प्रशासनाने कारवाई करून रोखावी, अशी मागणी खरपुडीचे सरपंच हिरामण मलघे, देवस्थान ट्रस्ट्रीचे अध्यक्ष सोपान गाडे, मोतीराम काळे, प्रकाश गाडे, राजेश गाडे, कांताराम शिंदे, दत्ता गाडे याच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
खरपुडी खुर्द येथे रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने मुरूम उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:13 AM