खरपुडी खंडोबा या परिसरात वनपरिक्षेत्र आहे. वनपरिक्षेत्रात मोर, तरस, कोल्हा, लांडगा,बिबट्या याचा संचार आहे. तरस या वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालून व पुरुषांसह काही जनावरांना चावा घेऊन जखमी केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आज दि. ५ रोजी सकाळी वाकी (ता. खेड) येथील शेतकरी पांडुरंग सहादू जाधव हे शेताकडे येत असताना तरसाने त्यांच्यावर हल्ला करून हाताला व पायाला चावा घेऊन लचके तोडले. तसेच राहुल गाडे (रा. खरपुडी )हे मोटारसायकलवर जात असताना रस्त्यावर तरस अचानक आडवा आला. मोटार सायकलची धडक तरसाला बसल्यामुळे राहुल गाडे हे रस्त्यावर पडले. दरम्यान तरसाने गाडे यांच्यावर हल्ला चढवून हाताला चावा घेऊन गंभीर जखमी केले. मोटारसायकलची धडक जोरात बसल्यामुळे तरसाला जोराचा मार लागल्यामुळे काही अंतरावर जाऊन तरसाचा मूत्यू झाला असे वनविभागाने सांगितले. ग्रामस्थांनी जखमींना प्राथमिक उपचारसाठी तत्काळ चाकण येथे दाखल केले. मात्र गंभीर जखम असल्याने पुणे येथील ससून रुग्णालयात हलविले आहे. घटना समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय फापाळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
खरपुडी येथे तरसाने दोघाचे लचके तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:13 AM