लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर: पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटाचे काम करणाऱ्या रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीला खेडच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी अनधिकृत उत्खननाबाबत ३ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड कंपनीने वेळेत न भरल्यामुळे अनधिकृतरीत्या साठविलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारावर त्याची बोजा नोंद करण्यात आली आहे.
गेली दोन वर्षांपासून खेड बायपास घाटाचे काम सुरू आहे. हे काम रोडवेज सोल्युशन कंपनीने घेतले आहे. काम करताना सुरूंग लावून डोंगर फोडण्यात आला आहे. डोंगर फोडताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुरूम, दगडाचे उत्खनन झाले. हा मुरूम रस्त्याच्या कामासाठी वापरणे गरजेचे होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने खासगी शेतकऱ्याच्या जागेत गट क्रमांक ७४/३ मध्ये ८ हजार ब्रास मुरुम, माती, दगड याचा साठा केला. याचा एका शेतकऱ्याला फायदा झाला. हा साठा करताना या हिस्सातील दोन शेतकऱ्यांनी मुरुम साठा करण्यासाठी ना हरकत स्टॅम्प पेपरवर लिहून दिली होती. या भरावाबाबत हरकत घेऊन बाळासाहेब शामराव थिगळे या शेतकऱ्याने त्याबाबत उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक १३ यांच्याकडे तक्रार केली होती. या अनधिकृत भरावाबाबत तहसीलदारांनी पंचनामा केला. पंचनाम्यामुसार आनंदा थिगळे, शांताराम थिगळे, दशरथ थिगळे यांच्यासह कंपनीला नोटीस काढून म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. कंपनीला झालेल्या दंडाची रक्कम निविदा रकमेतून कमी करून बोजा काढून टाकावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कोट
पंचनाम्यानुसार गौण खनिज रस्त्याचे कामासाठी वापरणे गरजेचे होते. मात्र, कंपनीने परवानगी न घेता खासगी खोलगट जागेत भराव करून संबधितांना याचा फायदा पोहोचावला. या अनधिकृत भराव व उत्खननाबाबत कंपनी व शेतकरी दंडात्मक कारवाईस पात्र आहेत.
- वैशाली वाघमारे, तहसीलदार, खेड
कोट
रोडवेज सोल्युशन कंपनीने मुरूम संपादित केलेल्या जमिनीत टाकला आहे.
भराव शेतकऱ्यांच्या परवानगीने टाकला आहे. भरावाचा पंचनामा करताना नॅशनल हायवेला विचारायला हवे होते. येथे कुठलेही बेकायदेशीर उत्खनन अथवा वाहतूक केली नाही.
- राजेंद्र घोलप, सुपरवायझर
रोडवेज सोल्युशन कंपनी प्रा .लि.
फोटो १ ) भराव करण्यात आलेली जागा
२) बोजानोंद झालेला सातबारा