दावडी - पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात रस्त्यावर पावसामुळे डोंगरावरील दरड कोसळण्याचे चित्र दिसत आहे. तसेच दरडीचे दगड-माती थेट रस्त्यावर येत असून दरडीमुळे रस्त्यांची चारी बुजून पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे अपघात होत आहेत, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.पुणे-नाशिक हा प्रमुख राष्ट्रीय मार्ग क्र. ५० म्हणून ओळखला जात असून या मार्गावरून दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. पुणे व नाशिक येथे जाण्यासाठी प्रवासी या मार्गाचा वापर करतात. खेड घाट ते चांडोलीदरम्यान या रस्ता बाह्यवळणाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालकांना खेड घाटातून जाण्याशिवाय पर्याय नाही. अवघड व धोकादायक वळणे असलेल्या या घाटातून वाहने चालवणे मोठे जिकिरीचे असते. पावसाळ्यात अनेक वेळा या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरून वाहनचालकांना व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. डोंगरातून घाट असल्याने कधी कधी पावसाळ््यात डोंगरावरील माती-दगड ढिले होऊन मोठमोठी झाडेही रस्त्यावर आडवी होतात. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहतूककोंडी होते.या रस्त्याच्यालगत असलेल्या पाणी वाहून नेण्यासाठी खोदलेल्या चाऱ्या दगड-मातीने बुजून गेल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. घाट संपेपर्यंतचा हा रस्ता संपूर्ण उताराचा असल्याने भरधाव वेगाने वाहने चालवणाºया वाहनधारकांना या धोकादायक अपघाती वळणांची कल्पना येत नाही. परिणामी या नागमोडी वळणावर वारंवार वाहने उलटतात. कठडा तोडून कोसळतात. या घाटात नेहमी अपघात होत असल्याचे चित्र दिसत आहे. बाह्यवळण होणार असल्याने या खेड घाटाकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले असल्याचे नागरिकांचे मत आहे. तोपर्यंत या घाटात किती अपघात होतात, याची त्यांना कल्पना नाही, असेच चित्र सध्या तरी दिसत आहे.
खेड घाटात पहिल्याच पावसात दरडी निखळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 2:46 AM