ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. 28 - खेड पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे सात उमेदवार व त्यामध्ये सभापती पदाच्या उमेदवार सुभद्रा शिंदे ह्या निवडून आल्याने त्यांचे नाव या पदासाठी निश्चित झाले आहे, तर समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे आमदार सुरेश गोरे यांनी सांगितले आहे.
तालुक्यात शिवसेनेचे सात, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, भाजपाचे दोन व काँग्रेसचा एक उमेदवार असे बलाबल आहे. शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आणखी एकाची गरज आहे. युती न करता समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे आमदार गोरे यांनी स्पष्ट केले आहे. गोरे यांच्या नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हापरिषद गटातील महाळुंगे गणातून अमोल गुलाबराव पवार हे काँग्रेसचे तालुक्यातील एकमेव उमेदवार निवडून आले आहेत.
आपल्या गटावर पकड कायम राहण्यासाठी गोरे यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यास पवार यांना उपसभापती पदाची संधी मिळू शकते. पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटातील पाईट गणातून चांगदेव शिवेकर व पिंपरी गणातून धोंडाबाई खंडागळे हे दोन्ही उमेदवार निवडून आणून शरद बुटे यांनी त्यांची गटावरील पकड मजबूत केली आहे.
त्यांचेही दोन्ही उमेदवार सोबत आल्यास सत्तेत घेण्यास आमदार गोरे तयार आहेत. मात्र उपसभापती पद गोरे हे बुटे यांच्या उमेदवारांना देतात की स्वतःच्या गणातील पवार यांना देतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. शिवेकर यांना उपसभापती पद दिल्यास बुटे यांची पश्चिम पट्ट्यात अधिकची ताकद वाढून तालुक्यात भाजपाचे संघटन अधिक बळकट होईल.
त्यामुळे हा निर्णय गोरे घेतील का याकडे सर्वांचे लक्ष आहे. पवार यांना संधी दिल्यास त्यांचा स्वतःचा गट मजबूत करून महाळुंगे गणातील आपली पकड मजबूत करण्यास मदत होईल असे चित्र स्पष्ट होत आहे. आमदार गोरे यांच्या बालेकिल्ल्यात जास्तीत जास्त विकास कामे करून घेण्यासाठी तसेच उपसभापती पदाची संधी मिळाल्यास पवार हेसुद्धा सेनेसोबत सत्तेत जाण्यास अनुकूल आहेत.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने सत्ता स्थापन करताना काँग्रेससह भाजपचे एकमेव उमेदवार अमृत शेवकरी यांना सोबत घेऊन कल्पना गवारी यांना सभापती केले होते हे सर्वश्रुत आहे.